नीट परिपरिक्षेत झालेल्या गैरप्रकारांची सीबीआय चौकशी करावी -ॲड. जयश्री शेळके 

0

बुलडाणा,(प्रतिनिधी)- वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या राष्ट्रीय पात्रता सह-प्रवेश परीक्षेमध्ये (नीट) झालेल्या गैरप्रकाराची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी जिप सदस्य बुलडाणा तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव ॲड.जयश्री शेळके यांनी केली आहे.

       नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत दरवर्षी राष्ट्रीय पात्रता सह-प्रवेश परीक्षा (नीट) घेण्यात येते. यावर्षी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेचा नुकताच निकाल जाहिर करण्यात आला आहे. नीट परिक्षेमध्ये चांगले गुण घेवून गुणवत्ता यादीत अव्वल येण्याचे स्वप्न विद्यार्थी उराशी बाळगून असतात. परंतु देशातील टॉपच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये मर्यादीत जागा असल्याने चांगल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळणे कठीण असते. 

     यावेळी लागलेल्या निकालात विद्यार्थ्यांना अनपेक्ष‍ित गुण मिळाल्याने पालकांनी परीक्षेमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप प्रशासनावर केला आहे. नीट परीक्षा होण्यापुर्वीच पेपर लिक झाल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांवर प्रसारित झाल्या होत्या. परीक्षेचे स्वरुप अत्यंत कठीण असूनही यावर्षी एकुण 67 विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 गुण मिळाले आहेत. यामध्ये हरियाणातील एकाच परीक्षा केंद्रावरील 8 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. अनेक शिक्षकांच्या मते एकाच परीक्षा केंद्रावर अशा प्रकारे पैकीच्या पैकी गुण मिळणे शक्य नाही. ज्या विद्यार्थ्यांना पेपर उशीरा मिळाला अशा विद्यार्थ्यांना ग्रेस दिल्याने किंवा गुणांचे सामान्यीकरण केल्याने विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळाले आहेत असा खुलासा नॅशनल टेस्टिंग एजन्सीने केला आहे. मात्र लोकसभा निवडणूकीच्या निकालाची तारिख असतांनाच नीट परिक्षेचा निकाल जाहिर करण्याची घाई एजन्सीने का केली, असा देखील आरोप पालक वर्गाकडून केला जात आहे. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांचा रोष लक्षात घेवुन यावर्षी झालेल्या राष्ट्रीय पात्रता सह-प्रवेश परीक्षा (नीट) परीक्षेत झालेल्या गैरप्रकाराची सीबीआय चौकशी करुन दोषी अधिकाऱ्यांवर तसेच दोषी विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव ॲड.जयश्री शेळके यांनी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here