विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू
म्हसवड : येथील शिक्षक कॉलनी परिसरात एका नूतन बंगल्याच्या वास्तुशांती समारंभातील जेवणातून १०० ते १५० जणांना विषबाधा झाली. त्यांच्यावर म्हसवड येथील शासकीय रुग्णालय तसेच तीन ते चार . खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की म्हसवड येथे सोमवारी (ता. १०) एका नूतन घराची वास्तुशांती होती. वास्तुशांतीच्या ठिकाणी जेवण केल्यानंतर सुरुवातीला काही लोकांना मळमळ, उलटी आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला.
काही वेळानंतर बऱ्याच लोकांना एकसारखाच त्रास व्हायला सुरुवात झाल्याने संबंधितांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी म्हसवडमधील चारही खासगी दवाखान्यात रुग्णांना जागा देखील उपलब्ध नव्हती, अशी माहिती मिळाली आहे.
यावेळी काही रुग्णांना १०८ नंबरच्या रुग्णवाहिकेने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सूत्रांकडून समजत आहे. सरकारी दवाखान्यात देखील काही बाधित रुग्णांनी उपचार घेतले. याबाबत माण पंचायत समितीचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधावा असता त्यांनी या घटनेला दुजोरा दिला.
तहसीलदार विकास अहिरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर व म्हसवडचे सहायक पोलिस निरीक्षक सखाराम बिराजदार यांनी रुग्णांची प्रत्यक्ष चौकशी करून घटनास्थळी पाहणी केली, तसेच संबंधित अन्नाचे नमुनेही पुणे येथे पाठविले आहेत. येथील विविध खासगी व शासकीय रुग्णालयात दाखल केलेल्या सर्व बाधित रुग्णांवर उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात येत आहे.