बुलडाणा,(प्रतिनिधी )- जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा,वाकोद तालुका फुलंब्री जिल्हा संभाजी नगर येथील इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या २० विद्यार्थ्यांचे आज १५ जून या पहील्या दिवसी विविध उपक्रमांनी स्वागत करून शाळा प्रवेशोत्सव सोहळा अतिशय आनंदात,उत्साहात संपन्न झाला.शिक्षक आणि गावकऱ्यांकडून नवोदित विद्यार्थ्यांचे स्वागत सनई चौघडा वाजवून,बैलगाडीतून मिरवणूक काढून करण्यात आले.
या प्रसंगी सर्व शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची संपूर्ण गावातून प्रभात फेरी काढण्यात आली.शैक्षणिक जनजागृतीपर विविध फलक घेऊन,विविध घोषणा देवून विद्यार्थ्यांनी प्रभात फेरीत आपला सक्रिय सहभाग नोंदविला.नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी फुलंब्री पंचायत समितीच्या गट शिक्षणधिकारी क्रांती धसवाडीकर मॅडम,शिक्षण विस्तार अधिकारी राजेश महाजन,समग्र शिक्षा अभियान जिल्हा समन्वयक अंकुश बडक,शालेय पोषण आहार तालुका अधिक्षक रामेश्वर राखुंडे सर,ग्राम पंचायत सरपंच आशाताई कापडे,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष डिगांबर ताठे,ग्राम पंचायत उपसरपंच वामनराव ताठे,गावातील मान्यवर यांची विशेष उपस्थिती होती.पाहिलीत प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प,मिठाई,चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले.या चिमुकल्यांच्या पायांचे ठसे घेऊन चिरंतन स्मृती जपण्याचा उपक्रम घेण्यात आला.सेल्फी पॉइंट वरील नवोदितांची आकर्षक छबी टिपण्यात आली.
या प्रसंगी स्वागत सभा घेण्यात आली.या सभेत गट शिक्षण अधिकारी क्रांती धसवाडीकर यांनी नवागत विद्यार्थ्यांना भावी शैक्षणिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या तर शिक्षण विस्तार अधिकारी राजेश महाजन यांनी वाकोदच्या जिल्हा परिषद शाळेच्या शैक्षणिक प्रगतीचा गौरव केला.या प्रसंगी अंकुशराव बडक,दिगांबर ताठे, दत्ता ताठे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.नवागत विद्यार्थ्यांचे विविध बौद्धिक,शारीरिक खेळ घेण्यात आले.ईतर वर्गातील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.सर्व विद्यार्थ्यांना स्वादिष्ट पुलाव आणि मोतीचुरच्या लाडूची मेजवानी देण्यात आली.या आगळ्या- वेगळ्या कार्यक्रमाने सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू फुलले होते.हा नयनरम्य सोहळा घडवून आणण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक सदाशिव बडक,ज्येष्ठ शिक्षक विठ्ठलराव साळवे,सांडू शेळके,उज्वलकुमार म्हस्के,नितीन शेळके,मंगल पाटील,मंगला वेळे,संगीता वाढोनकर,उमेश कापडे,वर्षा कापडे यांनी परिश्रम घेतले.