निसर्गाचं लेणं “कुडपण” गाव खुणावतेय

0

पोलादपूर : अंगावर पावसाच्या धारा झेलत चिंब भिजत रानोमाळ हुंदडायचंय, दऱ्याखोऱ्यांतून डोंगर माथ्यांवरून कोसळणाऱ्या शुभ्र धबधब्याखाली मनसोक्त भिजायचंय, निर्सगाच्या सानिध्यात रमायचंय!
असा बेत आखत असाल तर निश्चितपणे पोलादपूर तालुक्यातील कुडपण खुर्द या गावाला आवर्जून भेट द्या! तुमच्या कामाचा आठवड्याचा क्षीण निघून जाईल.
पोलादपूर शहरापासून 29 किलोमीटरवर सर्वाधिक उंचावर वसलेलं रायगड जिल्ह्याचे शेवटचे टोक अन् पुणे, सातारा जिल्ह्यांच्या सीमेवरील शिवकालीन वारसा लाभलेलं ऐतिहासिक प्रेक्षणीय स्थळ. सह्याद्रीच्या डोंगररांगांनी सभोवताली कडं केलं असून कुशीत वसलेलं गावपण जपणारे अंदाजे 70 ते 80 घरांचं शेलारांच गाव नरवीर तानाजी मालुसरे यांचे मामा
सुभेदार कोंडाजी शेलार यांचे जन्मगाव. माथ्यावर वसलेल्या गावाजवळच जमिनीतून 700 फूट उंच असा अलग असलेला नितळ कातळाचा सुळका उभा आहे. त्याला भीमाची काठी असे संबोधले जाते. तेथून जवळच डोंगर माथ्यावरून वाहात आलेला पाण्याचा प्रवाह खाली उडी घेतो. आता हा धबधबा प्रवाहित झाला आहे. कड्यावरून जलप्रप्रात कोसळताना आजुबाजूचा कित्येक फूट उंच तुषारांचे निर्माण झालेले धुक्याचे शुभ्र वलय डोळ्यांचे पारणे फेडतात.
गावात प्रवेश करताना पाथरी खिंड पार करतेवेळी आजुबाजूच्या परिसरातील हिरवीगार शाली लपेटलेली दाट झाडी ताना मन प्रसन्न होते. शेलार खिंडीतून विस्तीर्ण माळरानावरून चालताना, खळखळ गुंजारव करत वाहाणाऱ्या ओढ्याच्या पाण्यातून वाट काढत दाट झाडीतून पालापाचोला तुडवत भटकंती करण्याची मज्जा काही औरच! ट्रेकिंगसाठी हे एक उत्तम स्थळ आहे. गावाच्या पाठीमागील डोंगर माथ्यावरून आसमंत न्याहाळताना निर्सगाचे ते सहस्त्रकरांनी उधळलेलं विलोभनीय रूप मनावर गारूड करतेच!
गाव अतिथ्यशील असून येथील सरपंच हनुमंत शेलार बाबा तुम्हाला सुभेदार शेलारमामांच्या तत्कालीन शस्त्रांची माहिती देत जवळच असलेल्या शेलारमामांच्या समाधीचे दर्शन घडवतात. येथून मकरंदगडाचे पुसटसे दर्शन घडते तसेच सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, जावळी आणि रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील गावे ता येतात.

कसे जाल?

पोलादपूरहून कुडपण एसटी गाडी सुटते. स्वतःचे वाहन असेल तर उत्तम. गावात राहण्याची आणि जेवणाची सोय आहे.

(Edited by – Swami Sadanand) 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here