कोपरगाव ; कोपरगाव शहरातील नागरिकांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या पाणी प्रश्नावरील उपाय म्हणून नव्याने तयार होत असलेल्या ५ नंबर साठवण तलावाच्या तळाशी काँक्रिटीकरण का केले नाही ? याचा खुलासा नगरपालिकेने जनतेला करावा असे आवाहन माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी पालिका प्रशासनाला केले आहे.
पाटील यांनी प्रसिद्धी केलेल्या पत्रका मध्ये या साठवण तलावाच्या कामामध्ये असलेल्या अनेक त्रुटीवर बोट ठेवले आहे. यात म्हटले आहे की कोपरगाव नगरपालिकेच्या येसगाव येथील ५ नंबर साठवण तलावाच्या चारी बाजूला काँक्रिटीकरणाचे भिंत उभी केली. परंतु तळामध्ये मातीची भर व प्लास्टिकचा कागद टाकून ते काम पूर्णत्वाकडे नेत आहात. याबाबत काँक्रिटीकरण तळात का केले नाही याचा खुलासा जनतेला नगरपालिकेने दिला पाहिजे.
दुसऱ्या ठिकाणाहून पाणी या तळ्यामध्ये खालून सध्या आत येत आहे. याचा अर्थ लिकेजेस / पर्क्युलेशन आहे. जर पाणी आत येत असेल तर निश्चित ५ नंबरचे तळे पूर्ण भरल्यानंतर पाण्याच्या दाबाने बाहेर पाझर होऊ शकतो .
तळ्याच्या खालच्या भागात काही ठिकाणी मातीची भर टाकली, त्यावर वाळू/बारीक क्रश आर्टिफिशल खडी टाकली व त्या खडीवर प्लास्टिकचा कागद टाकून त्यावर पुन्हा मातीचा मोठा थर दिला आहे. तर काही भागांमध्ये बारीक खडीमुळे कागद फाटेल म्हणून काही भागांमध्ये बारीक खडी/वाळू न टाकता पूर्ण मातीचाच थर दिलेला दिसून येत आहे. या तलावाचे काम सुरु असतानाचदुसऱ्या तळ्यामधून या तळ्यात खालून पाणी पाझरून येत आहे .ते बंद करणे आवशक असताना तसे न करताच पोकलेन मशीन व ट्रॅक्टरने ते पाणी झाकून देऊन त्यावर काम चालू केलेले आहे. आधीच कोपरगावकर गढूळ व अस्वच्छ पाण्यासाठी व ५ दिवसाआड आठवड्यातून एकदा, १५ दिवसातून एकदा तर २५ दिवसातून एकदाच पाणी असं त्रास भोगत आहे.
खालून जर मातीचा पाण्यामुळे गाळ झालेला आहे , तर त्याचं कॉम्पॅक्शन होऊ शकणार नाही आणि मग तसाच कागद आणि नुसती माती वर कॉम्पेक्षण न करता . अशा पद्धतीने माती पक्की होईल का. तसेच जो प्लास्टिकचा कागद टाकला आहे त्याचे जॉईंट बरोबर जोडलेत का आणि तळ्याच्या सर्व चारी कडेच्या बाजूला तो कागद आणि भिंत यातली गॅप बुजली हे पाहणे आवशक आहे. अशा प्रकारे अनियमित केलेल्या कामाचे निरीक्षण आणि ऑडिट होणे गरजेचे आहे. अन्यथा हे तळे झाल्यानंतर जर लिकेज राहिले तर पुन्हा कोपरगावच्या नागरिकांना पाणी टंचाईचा त्रास सहन करावा लागणार आहे.
तळ्याच्या खोदाई दरम्यान काही ठिकाणी तळाला काळा पाषाण (हार्ड रॉक) होता तर काही ठिकाणी कडक मुरुम ही होता. तलावाचा पृष्ठभाग सर्वत्र समान नसल्याकारणाने काँक्रिटीकरणच खालच्या तळाला करणे गरजेचे होते. शिवाय तलावामध्ये पालिका मत्स्य पालनही करू शकते त्यावेळी त्यात खेकडे असले तर ते खेकडे मातीतून प्लास्टिकचा कागद सहज कुरतडतील. काँक्रिटीकरण जर केले असते तर पाणी लिकेज झाले नसते व कॅनल मधून तळ्यात आलेला गाळ हा काढता आला असता , परंतु खाली जर माती टाकली तर भविष्यात तो गाळ काढणार कसा. असे सर्व असताना कागद टाकायचा हे कोणत्या आधारे नगरपालिकेने ठरवले. असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे.