सातारा/प्रतिनिधी :
सातारा जिल्ह्यात जावली तालुक्यासह ठिकठिकाणी कोट्यवधी रुपयांच्या खैराच्या झाडांची अक्षरशः वारेमाप तोड सुरू आहे. जावळीतील वनविभाग व वृक्षतस्कर यांच्या संगणमताने हा प्रकार सुरू असून नागरीकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन ही लूट सुरू आहे. तसेच अवैधरित्या तोडलेल्या हजारो टन खैरवृक्षांची राजरोसपणे वाहतूक केली जात आहे. याप्रकरणी येत्या पंधरा दिवसात संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवर ठोस कारवाई न झाल्यास जावळीच्या वनविभागास कार्यालयास टाळे ठोकण्यात येतील, असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी दिला आहे.
कोल्हापूर येथे मुख्य वन संरक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांची भेट घेऊन उपरोक्त आशयाचे लेखी निवेदन देऊन मोहिते यांनी याप्रकरणी ठोस कारवाईची मागणी केली. त्यावर कोल्हापूर परिक्षेत्राचे मुख्य वनसंरक्षक रामानुजन यांनी संबंधितांवर तातडीने कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले असून कारवाईबाबतचे आदेश संबंधित कार्यालयांना पाठवले आहेत.
जावळी तालुक्यामध्ये अवैधरित्या सुरू असलेल्या खैरवृक्षाच्या तोडणीसह वाहतुकीमुळे पर्यावरणाचा रहास होण्याबरोबरच गोरगरीब शेतकऱ्यांची फसवणूक आणि वन खात्यातील भ्रष्टाचारही फोफावताना दिसत आहे. खैरा बरोबरच अन्य दुर्मिळ वनौषधी वृक्षांची ही मोठ्या प्रमाणावर होत असलेली कत्तल वन अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादानेच होत असल्याने या प्रकरणाला गंभीर वळण लागत आहे. वरिष्ठांनी दखल घेऊन याप्रकरणी कारवाईची हालचाल केली तरच याबाबत अंशतः तरी सुधारणा होईल, स्थानिक पातळीवर दखल घेतली जात नसल्याने कोल्हापूर परिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. कोल्हापूर परिक्षेत्राच्या मुख्य वनसंरक्षकांना निवेदन देताना मोहिते यांच्या समवेत शिवसेनेचे तालुका प्रमुख सागर रायते, सुनील पवार, जिल्हा उपसंघटक रूपेश वंजारी समन्वयक हरी पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.