कोल्हापुरातील माणगावात आंदोलक-पोलिसांत झटापट
कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्गाबाबत स्थगिती जाहीर करूनही अधिकाऱ्यांकडून नोटिसा पाठविण्यात येत असल्याने आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी आज मुख्यमंत्र्यांचा कोल्हापूर दौरा रद्द झाल्यानंतरही हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या प्रतिमांनाच महामार्ग रद्द करण्याचे निवेदन सादर करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी शासनआदेशाची होळी करून निषेध नोंदवीत असताना पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. आंदोलकांकडून पोलीस पोस्टर्स काढून घेत असताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे पोस्टर्स फाटल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस आज कोल्हापूर दौऱ्यावर येणार होते. यावेळी शक्तिपीठ महामार्गबाधित शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार आज माणगाव येथे मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या डिजिटल पोस्टर्सजवळ शक्तिपीठ महामार्ग रद्द व्हावा, या आशयाचे निवेदन ठेवण्याचा प्रयत्न शेतकरी करीत होते. यावेळी पोलिसांनी पोस्टर्स काढून घेताना झालेल्या झटापटीत ते फाटले. यानंतर आंदोलकांनी भूमी अधिग्रहणाच्या नोटिसांची होळी केली. यावेळीही पोलिसांची तारांबळ उडाली. पोलीस नोटीस काढून घेण्याचा प्रयत्न करीत असताना गोंधळ उडाला होता. उपस्थित शेतकऱ्यांनी शासन व शक्तिपीठ महामार्गाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
दरम्यान, शक्तिपीठ महामार्गबाबत शासन दिशाभूल व दुटप्पीपणा करीत असल्याचा आरोप ‘शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समिती’चे समन्वयक गिरीश फोंडे, साजणीचे सरपंच शिवाजी पाटील यांनी केला.