शेषशायी विष्णू मूर्ती सिंदखेडराजामध्येच राहणार

0

भारतीय पुरातत्व विभागाने केले स्पष्ट

बुलडाणा,(प्रतिनिधी )- मातृतिर्थ सिंदखेडराजा येथील राजे लखोजीराव जाधव यांच्या समाधी जवळील शिव मंदिराच्या उत्खननात शेषशायी विष्णूची मूर्ती आढळली आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या मानकानुसार उत्खननात सापडलेल्या पुरातन वस्तू आणि अवशेष त्याच ठिकाणी जतन करण्यात येत असल्याने शेषशायी विष्णूची मूर्ती सिंदखेडराजा येथेच राहणार आहे, अशी माहिती भारतीय पुरातत्व विभागाचे पुरातत्वशास्त्रज्ञ अरुण मलिक यांनी दिली.

भारतीय पुरातत्व विभागातर्फे राजे लखोजीराव जाधव यांच्या समाधी जवळील शिव मंदिराचे उत्खनन सुरू आहे. मागील आठवड्यात उत्खननाचे काम सुरू असताना सव्वा मीटर खोलीवर भव्य शेषशायी विष्णूची मूर्ती आढळून आली आहे. ही मूर्ती साधारणतः अकराव्या किंवा बाराव्या शतकातील असण्याचा अंदाज आहे. ही मूर्ती दीड मीटर बाय सव्वा मीटर आकाराच्या दगडामध्ये कोरल्या गेलेली आहे. समुद्रमंथन आणि दशावतार यांचे अद्भुत कोरीव काम या मूर्तीमध्ये करण्यात आलेले आहे. ही मूर्ती क्लोरियट दगडामध्ये कोरल्या गेलेली आहे. साधारणतः हा दगड दक्षिण महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात आढळून येतो. या दगडावर बारीक कोरीव काम करणे शक्य आहे.

भारतीय पुरातत्व विभागाच्या सर्वसाधारण मानकानुसार उत्खननात सापडलेल्या सर्व वस्तू आणि अवशेष त्याच ठिकाणी जतन करण्यात येतात. भारतीय पुरातत्व विभागाच्या 49 कार्य ठिकाणी याच पद्धतीने पुरातन वस्तू आणि अवशेषांचे जतन करण्यात आले आहे. याच नियमानुसार सिंदखेडराजा येथे आढळलेली शेषशायी विष्णू मूर्ती सिंदखेडराजा येथेच जतन केल्या जाईल. राजे लखोजीराव जाधव यांच्या समाधी स्थळाच्या परिसरातच ही मूर्ती सुव्यवस्थितरित्या ठेवण्याची व्यवस्था करण्यात येईल. ही मूर्ती याच परिसरात ठेवण्यासाठी आधी व्यवस्था करण्यात येईल. त्यानंतरच ही मूर्ती हलवण्यात येईल. सध्या ही मूर्ती उत्खनन करून सुव्यवस्थित ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. शिव मंदिरामध्ये ही मूर्ती दबल्या गेल्यामुळे अत्यंत काळजीपूर्वक या मूर्तीला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.

ही मूर्ती कोणत्या शैलीतील आहे, याबाबत अधिक माहिती होण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. येत्या एका आठवड्यामध्ये या मूर्तीबाबत संशोधन होऊन अधिकची माहिती प्राप्त होईल. सध्यास्थितीमध्ये मूर्तीचे काळजीपूर्वक हाताळणे आणि योग्य ठिकाणी हलवण्याची व्यवस्था प्राधान्याने करण्यात येणार आहे, अशी माहितीही मलिक यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here