सिन्नर : येथील पाताळेश्वर विद्यालयास कै. अलोक संदीप रेवगडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आले मागील शैक्षणिक वर्षात विद्यालयातील इयत्ता सातवीचा विद्यार्थी कुमार अलोक संदीप रेवगडे याचे अचानक अपघाती निधन झाले. त्याच्या स्मृती प्रित्यर्थ वडील संदीप पंढरीनाथ रेवगडे यांनी विद्यालयातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्याचे कबूल केले व नुकतेच त्या साहित्याचे विद्यालयातील विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.
यामध्ये शालेय वस्तू वही, पेन, कंपास इ. शैक्षणिक साहित्य विद्यालयास भेट देऊन उपकृत केले. आपल्या पाल्याचे शाळेतील गतस्मृती आठवणीत ठेवण्यासाठी व आपल्या परिस्थितीची जाणीवपूर्वक आठवण ठेवून स्वतःच्या कुटुंबाचा खर्च भागून आपणही समाजासाठी काही देणे लागतो. या उदात्त भावनेतून संदीप पंढरीनाथ रेवगडे यांनी विद्यालयात येणाऱ्या निराधार आश्रम शाळेतील व परिसरातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी मी शालेय साहित्य भेट देण्याची ही परंपरा माझ्या मुलाच्या स्मृती प्रित्यर्थ कायम चालू ठेवेल व विद्यालयाच्या गरजांमध्ये एक खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करेल असे सांगितले.
यावेळी बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे सेक्रेटरी व विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. बी. देशमुख यांनी आपल्या विद्यालयातील एक हुशार व गुणी विद्यार्थी आपल्यातून अचानक गेल्याने आपण सर्वजण त्याच्या दुःखात सहभागी आहोत व आपल्याला त्याची सतत आठवण ठेवून त्याच्या स्मृतिपित्त्यर्थ त्याच्या वडिलांनी शाळेतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना देऊ केलेली शालेय भेट ही खरोखरच अनमोल व अभिमानास्पद बाब आहे असे सांगितले.
या कार्यक्रमासाठी बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष तानाजी ढोली ,सहसेक्रेटरी अरुणभाऊ गरगटे,पाडळी गावचे माजी सरपंच भगीरथ रेवगडे , शालेय समितीचे चेअरमन चंद्रभान रेवगडे, बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे कोषाध्यक्ष टी. के. रेवगडे, बी. आर. चव्हाण, आर. व्ही. निकम, एस. एम. कोटकर, आर. टी. गिरी, एम. एम. शेख, सविता देशमुख, सी. बी. शिंदे, के. डी. गांगुर्डे, एस. डी. पाटोळे, आर. एस. ढोली, ए. बी. थोरे उपस्थित होते.