नगर – आपल्या पाल्यास शिक्षण घेतांना कोणत्याही अडचणी येऊ नये, त्याला सर्वकाही भौतिक सुविधा मिळाव्या, यासाठी पालकांची धडपड असते. शिक्षकही आपला विद्यार्थी सर्वत्तोम व्हावा, यासाठी प्रयत्न करत असतात. परंतु पालकांनी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी शिक्षकांशी संवाद साधला पाहिजे. त्यामुळे मुलाच्या प्रगतीची माहिती मिळवून त्यादृष्टीने नियोजन करणे सोपे होते. शिक्षकांवर विश्वास ठेवून त्यांच्या सूचनांचे पालन केल्यास विद्यार्थ्यांचीही प्रगती होते. गरजेच्या गोष्टी पुरवा पण मुलांवर अवास्तव अपेक्षा लादू नका आणि लाडही करु नका. अभ्यासबरोबरच खेळ, इतर क्षेत्राचे ज्ञान देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वास्तवादी जीवन जगण्याचे धडे शिक्षक व पालकांनी विद्यार्थ्यांना द्यावे, त्यामुळे स्वत: निर्णयक्षम होऊन चांगल्या-वाईट काय हे त्याला कळेल. पालक-शिक्षकांच्या समन्वयातूनच विद्यार्थ्यांचे भविष्य घडले जाईल, असे प्रतिपादन प्राचार्य अजकुमार बारगळ यांनी केले.
अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या रुपीबाई मोतीलालजी बोरा न्यू इंग्लिश स्कूल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पालक-शिक्षक सभा संपन्न झाली. याप्रसंगी प्राचार्य अजयकुमार बारगळ, उपप्राचार्या आरण्ये वंदना, पर्यवेक्षक बाळासाहेब वाबळे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी पर्यवेक्षक बाळासाहेब वाबळे म्हणाले, विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा, यासाठी संस्थाचालक, शिक्षक हे प्रयत्नशील आहेत. प्रत्येक वर्गाचे शालेय व सहशालेय वार्षिक नियोजन केले जात असल्याने विद्यार्थ्यांची प्रगती साधली जात आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना विविधा स्पर्धा परिक्षा, क्रीडा, सांस्कृतिक प्रकारासाठी प्रोत्साहित करुन त्यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन घेतले जात आहे. विशेषत: 10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांची चांगली तयारी करुन घेतली जात आहे. यात पालकांनीही सहकार्य करणे अपेक्षित आहे. आपल्या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी पालकांनी – शिक्षकांशी संवाद साधल्यास नक्कीच आपला विद्यार्थी यशस्वी होईल, असे सांगितले.
यावेळी पालकांनी विद्यार्थी गैरहजार असतील तर व्हॉटस्अॅपवर मेसेज पाठविणे, विद्यार्थ्यांना क्लापासून परावृत्त करावे, घरी दिलेल्या अभ्यासावर पालकांची सही आणण्यास सांगणे असे अनेक मुद्दे उपस्थित केले. यावर प्राचार्य, उपप्राचार्या, पर्यवेक्षक यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पालकांच्या सूचनांची अंमलबजावणी केली जाईल, असे सांगितले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुनंदा खंडागळे, गायत्री रायपेल्ली, सविता लोखंडे, रेणुका कुलकर्णी, सागर राऊत, मेघा जोशी, शिल्पा गांधी आदिंनी सहकार्य केले. सूत्रसंचालन सोमनाथ नजान यांनी केले तर आभार संकेत क्षेत्रे यांनी मानले.
पालक-शिक्षक संघास संस्थेच्या प्रमुख कार्यवाह श्रीमती छायाताई फिरोदिया, नियामक मंडळाचे अध्यक्ष अशोक मुथा, स्कूल कमिटीचे चेअरमन गौरव मिरीकर, सल्लागार मंडळाचे भुषण भंडारी आदिंनी शुभेच्छा दिल्या.