आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नांना यश
जामखेड तालुका प्रतिनिधी :– प्रधानमंत्री पिक विमा योजना २०२३ साठी कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांसाठीही तब्बल ९९ कोटी ४५ लाख रुपये मंजूर झाले आहेत. विम्याची ही रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. यासंदर्भात आमदार रोहित पवार यांनी अधिकारी आणि विमा कंपनीकडे पाठपुरावा केला होताच शिवाय विधिमंडळाच्या अधिवेशनातही या प्रश्नावर आवाज उठवला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.
आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्यामुळे गेल्याच महिन्यात जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी मागील वर्षीच्या खरीप पिक विम्याचे ४४ कोटी रुपये मंजूर झाले आणि ते शेतकऱ्यांच्या खात्यावरही जमा झाले. त्यामुळे कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांना या विम्याच्या या पैशांची प्रतिक्षा होती. आमदार रोहित पवार यांनी प्रशासनाच्या सहकार्याने कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्वतःच्या यंत्रणेच्या मदतीने गावोगावी जाऊन गेल्या वर्षी शेतकऱ्यांकडून पीक विम्याचे फॉर्म भरुन घेतले होते. त्यामुळे जिल्ह्यात पीक विमा भरण्यात कर्जत-जामखेड मतदारसंघाचा अव्वल क्रमांक होता. केवळ फॉर्म भरण्यापुरतेच आमदार रोहित पवार यांनी प्रयत्न केले नाहीत तर पीक विमा हा नियमात बसताच तो शेतकऱ्यांना मिळावा यासाठी अधिकारी, मंत्री आणि विमा कंपनीकडे त्यांनी पाठपुरावा केला होता. तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि हिवाळी अधिवेशानतही त्यांनी या विषयावर आवाज उठवला होता. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच गेल्या महिन्यात जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना ४४ कोटी रुपये मिळाले. आता कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांसाठीही ९९ कोटी ४५ लाख रुपये मंजूर झाले आहेत. त्यासाठी नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही आमदार रोहित पवार यांनी आवाज उठवून ही रक्कम तातडीने मंजूर करण्याची मागणी केली होती. त्यानुसार ओरिएंटल क्रॉप इन्शुरन्स कंपनीकडून ही रक्कम जमा झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे..
गेल्या पाच वर्षांचा विचार केला तर आमदार रोहित पवार यांनी सातत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवला आहे आणि त्यांचे प्रश्न लावून धरत ते मार्गी लावण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी शेतकऱ्यांना भरघोस पीक विम्याची रक्कम मिळवून दिलीच पण आमदार म्हणून निवडून येण्यापूर्वीची मतदारसंघातील शेतकऱ्यांची रखडलेली ११० कोटी रुपये पीक विम्याची रक्कमही त्यांनी मिळवून दिली होती. पीक विम्याच्या रकमेसाठी कोणतेही आंदोलन करण्याची वेळ येऊ आमदार रोहित पवार यांनी येऊ दिली नाही त्यामुळे यांच्याविषयी शेतकऱ्यांमध्ये एक कौटुंबिक नाते निर्माण झाले आहे.