सातारा : अनेक संघटनामध्ये कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांनी सामाजिक भावनेने बहुजनांनी एकत्र येणे काळाची गरज आहे.असे प्रतिपादन सलीम शेख यांनी केले. येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील सांस्कृतिक सभागृहात बहुजन सर्वपक्षीय मेळ्यात शेख बोलत होते.यावेळी दलित-मुस्लिम यांच्या हक्कासाठीच्या लढ्याबाबत चर्चा विनिमय करण्यात आला.रिपब्लिकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांच्या अभिष्टचिंतनपर रिपब्लिकन पक्षाचे राज्य उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.शेख पुढे म्हणाले,”वैचारिक पातळीवर एकसंघपणे लढा उभारला पाहिजे.त्यासाठी समान कार्यक्रम लवकरच आखण्यासाठी विशाल दृष्टिकोन ठेवून हातात घालुन चालणे अपरिहार्य आहे.”
दादासाहेब ओव्हाळ म्हणाले, “मुस्लिमांमध्ये परकीयपणाची भावना असता कामा नये. त्यासाठीच बहुजन एकत्रीत आंदोलन करून न्यायासाठी रस्त्यावर उतरत आहे.बाबासाहेब यांचा पुतळा २० फुटी झाला पाहिजे.त्यासाठी परिसरातील वाढीव जागाही मिळाली पाहिजे.यासाठीही एकत्र येणे गरजेचे आहे.”
चंद्रकांत खंडाईत म्हणाले, “आमच्या सर्व संघटना चार पावले नक्कीच पुढे जाईल.त्यासाठी मुस्लिम व इतरांनाही किमान एक पाऊल आमच्या सोबत आले पाहिजे.यापूर्वीही अनेक वेळा एकत्र येण्यासाठी प्रयत्न झाला होता.मात्र,यापुढे सामाजिक सलोखा राखण्यासाठी नक्कीच एकत्रीत आले पाहिजे.तरच राजकीय इफेक्ट निर्माण होईल.”
यावेळी मदन खंखाळ,प्रकाश फरांदे आदींचीही भाषणे झाली. संजय नितनवरे यांनी प्रास्ताविक केले.अनिल वीर यांनी वास्तव परिस्थीवर हल्लाबोल करीत आभारप्रदर्शन केले.सदरच्या कार्यक्रमास वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब जगताप, बाळासाहेब सावंत,रिपब्लिकन सेनेचे कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष दयानंद बनसोडे, रिपब्लिकन सेनेचे पाटण तालुकाध्यक्ष सचिन कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष आबा देवकांत, साप्ताहिक संपादक आबा कांबळे (शिवडे), डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे उपाध्यक्ष ऍड.विलास वहागावकर,आदी विविध क्षेत्रातील मान्यवर, दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.