केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससीने ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. युपीएससीने जारी केलेल्या प्रेस रिलीजनुसार युपीएससीमार्फत पूजा खेडकर यांनी केलेल्या कथित गैरप्रकारांची चौकशी पूर्ण झाली आहे.
पूजा खेडकर यांनी स्वतःच्या नावात, त्यांच्या वडिलांच्या नावात तसेच आईच्या नावात बदल करून केंद्रीय लोकसेवा आयोगाची फसवणूक केल्याचं या चौकशीत समोर आलं आहे. पूजा खेडकर यांनी परीक्षेचा फॉर्म भरत असताना फोटो, सही, ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि पत्ता बदलून परीक्षा देण्याची कमाल मर्यादा ओलांडली असल्याचं यूपीएससीने सांगितलं आहे.
या पत्रकात दिलेल्या माहितीनुसार पूजा खेडकर यांच्याविरोधात फौजदारी खटल्यासह अनेक कारवाई सुरू केल्या आहेत. 2022च्या यूपीएससी परीक्षेत त्यांची उमेदवारी का रद्द करण्यात येऊ नये? याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
या सोबतच नागरी सेवा परीक्षा-2022 च्या नियमांनुसार भविष्यात कोणतीही परीक्षा देण्यापासून त्यांना का रोखलं जाऊ नये? याबाबतही पूजा खेडकर यांना नोटीस बजावली आहे. याआधी ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचा प्रशिक्षण कालावधी स्थगित करण्याचा आदेश महाराष्ट्र सरकारनं दिला होता. पूजा खेडकर यांचा वाशिम येथील जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने दिले होते. लाल बहादूर शास्त्रीय प्रशासकीय अकादमी यांनी दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र शासनाने ही कारवाई केली. पूजा खेडकर यांना 23 जुलै पूर्वी मसूरी येथील अकॅडमीमध्ये पुन्हा हजर राहण्याचे आदेश दिले होते.
चौकशीसाठी समितीची स्थापना
पूजा खेडकर यांच्या प्रकरणात चौकशीसाठी केंद्र सरकारनं एका समितीची स्थापना केली होती. ही समिती पूजा खेडकर यांच्या निवडीबाबत करण्यात आलेले दावे आणि इतर तपशिलांची चौकशी करणार होती. दरम्यान पूजा खेडकर यांची वाशिम जिल्ह्यात बदली करण्यात आली होती. 11 जुलैला त्या वाशिममध्ये कर्तव्यावर रुजू झाल्या होत्या. प्रशिक्षणाच्या काळातच पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडं अवास्तव मागण्या केल्यामुळं आणि अरेरावी वर्तनामुळं त्यांच्याबाबत प्रचंड चर्चा झाली.