कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी चांदेकसारे येथे जनावरं चोरीच्या घटना वाढत असून या चोरांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. काल शनिवारी रात्री दोन वाजता भाऊसाहेब किसन खरात यांच्या वस्तीवरील पाच लाख रुपये किमतीचा घोडा चोरण्यासाठी आलेल्या चोरट्यांना घोडा चोरी करण्याचा अंदाज आला नसल्याने त्यांनी 40 हजार रुपये किमतीची गाभण असलेली गाय चोरून नेली आहे. या अगोदरही अरुणाबाई गहिनाजी माळी यांची गाय चोरीला गेली असल्याने ही सोनेवाडीतली दुसरी घटना आहे.तर चांदेकसारे येथील व्यापाऱ्यांच्याही गाई तीन महिन्यां पुर्वी चोरीला गेल्याने या परिसरात जनावरे चोरट्यांचा सुळसुळाट वाढला आहे.
भाऊसाहेब किसन खरात यांच्या वस्तीवरील सर्व कुटुंब शनिवारी रात्री आपले दैनंदिन काम आटवून झोपले असताना रात्री दोनच्या सुमारास घोडे चोरण्याच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांनी पिकअप गाडी आणली होती. घोड्याची चोरी करता आली नसल्याने त्यांनी घोड्याच्या बाजूला बांधलेली गायच चोरून नेली. पिकअप गाडीमध्ये काय चढवली असता गाईने हंबरडा फोडला. तेव्हा खरात कुटुंबातील सदस्य भाऊसाहेब खरात ,मीनाताई खरात, कैलास खरात, सुधीर खरात यांना जाग आली त्यांनी तात्काळ बाहेर येत आपली गाय चोरीला जात असल्याचे लक्षात आले. सुसाट वेगाने चोरटे गाय घेऊन पसार झाले. भाऊसाहेब खरात ,कैलास खरात व सुधीर खरात यांनी कोपरगाव पर्यंत या गाडीचा मोटरसायकल वर पाठलाग केला. मात्र आड बाजूच्या रस्त्याने गाडी गेल्याने त्यांना रिकाम्या हाताने माघारी परतावे लागले.
पोलीस पाटील दगू गुडघे यांना या संदर्भात त्यांनी माहिती दिली. सकाळी या घटनेची माहिती गुडघे यांनी पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांना दिली. गावातील सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता चार-पाच चोरटे व पिकअप व्हॅन जात असताना यामध्ये कैद झाले आहे. परिसरात जनावरांची चोरी होत असून नागरिकांनी सतर्क करावे असे आवाहन पोलीस पाटील गुडघे यांनी केले.गुरुपौर्णिमेच्या बंदोबस्तात पोलीस स्टेशनचे कर्मचारी असल्याने ठाणेदार उपलब्ध नसल्याने त्यांना फिर्याद देता आली नाही.
चोर हे गाईचे नव्हे तर घोड्याची चोरी करण्यासाठी आले होते. मात्र शिकवणीचा घोडा असल्याने घोड्याने त्यांच्याशी झटापट केली असावी. चोरट्याना चावा घेतला असावा. यामुळे त्यांना घोड्याची चोरी करता आली नाही.
भाऊसाहेब खरात... गाय मालक