राहुरी विद्यापीठ, दि. 24
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी हे देशामध्ये अग्रगन्य विद्यापीठ असून विद्यापीठ स्थापनेपासून या विद्यापीठामध्ये जैविक किडनाशकांच्या संशोधन, उत्पादन, प्रचार व प्रसार यासाठी विद्यापीठाने महत्वपुर्ण भुमिका बजावली आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी आणि अम्मा असोसिएशन, नाशिक यांच्यामध्ये जुलै, 2017 मध्ये जैविक किडनाशकांच्या संशोधन आणि नोंदणीसाठी सामंजस्य करार झाला होता. या सामंजस्य करारामध्ये वनस्पती
रोगशास्त्र व अणुजीवशास्त्र विभाग आणि कृषि किटकशास्त्र विभाग यांच्या संयुक्त संशोधनाव्दारे जैविक किडनाशकांची परिणामकारता, विषारीपणा व पर्यावरण पुरकता यावर संशोधनाअंती मिळालेली उपयुक्त माहिती केंद्रीय किटकनाशक मंडळ, फरीदाबाद यांच्याकडे नोंदणीसाठी सादर करण्यात आली.
कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली देशपातळीवर प्रथमच ट्रायकोडर्मा व्हीरीडी, बॅसिलस सबस्टीलीस, ट्रायकोडर्मा हर्जीयानम, सुडोमोनस फ्लुरोसन्स या चार नवीन जैविक किडनाशकांच्या प्रजातीसाठी व उत्पादनासाठी नोंदणीस मान्यता मिळालेली आहे. या चार नवीन जैविक किडनाशकांच्या नवीन प्रजातींना नोंदणी समितीची एकाच वेळी मान्यता मिळणे हे देशात प्रथमच घडले आहे.
या संशोधीत व नोंदणीकृत जैविक किडनाशकांच्या प्रजातींमुळे शेतकर्यांना पिकावरील किड व रोगांच्या व्यवस्थापनासाठी तसेच नियंत्रणासाठी वापरण्यात येणार्या रासायनिक किडनाशकांचा वापर कमी होऊन पर्यावरणपुरक रोग व किडींचे व्यवस्थापन होवून अंशविरहीत शेती उत्पादन घेणे शक्य होणार आहे. जैविक किडनाशकांच्या वापरामुळे रासायनिक किडनाशकांचा वापर कमी होऊन उत्पादन खर्चात बचत होणार आहे. ही बाब शेतकर्यांच्या दृष्टीने फायदेशीर असून शेतकर्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी महत्वाचे ठरणार आहे.