लोकसभा निवडणुकीत विरोधात काम केल्याने कर्ज नाकारल्याची चर्चा
मुंबई /कोपरगाव : लोकसभेच्या निवडणुकीआधी कोपरगावच्या सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी कारखान्याचा १२५ कोटी रुपयांचा तसेच राजगड सहकारी साखर कारखान्याचा ८० कोटी रुपयांचा मार्जिन लोन थकहमीचा प्रस्ताव कागदोपत्री त्रुटी असल्याचे कारण देत रद्द करण्यात आले असल्याची माहिती आज समोर आली आहे. कोल्हे कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष विवेक कोल्हे हे भाजपच्या राज्य पदाधिकारी तसेच भाजपच्या माजी आमदार स्नेहलता यांचे चिरंजीव आहेत . तर राजगड कारखाना काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांचा आहे . या दोन कारखान्यांना कर्ज नाकारताना आधी मंत्रिमंडळ उपसमितीच्या मंजुरीने राष्ट्रीय सहकारी विकास निगम (एनसीडीसी) मंजुरीसाठी १३ कारखान्यांच्यासाठी मदतीचे प्रस्ताव पाठवले होते
कोल्हे आणि थोपटेंच्या कारखान्यांना कर्ज नाकारताना राज्य सरकारच्या वतीने जरी कागदपत्रांची त्रुटी हे कारण सांगितले जात असले तरी यामागे लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल असल्याचे बोलले जात आहे. थोपटे यांनी बारामती मतदार संघामध्ये सुनेत्रा पवार यांच्या विरोधात कामा केले तर विवेक कोल्हे यांनी सुजय विखेंच्या विरोधात काम केले असल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे या दोन्ही ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यात विखे पाटील विरुद्ध कोल्हे कुटुंबाचा राजकीयवाद सर्वश्रुत आहे. विवेक कोल्हे यांची माजी खासदार सुजय विखे यांना निवडणुकीत मदत झाली नसल्याची चर्चा आहे. याआधी कोल्हे यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ताब्यात असलेला गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवत गानेश्वरील विखे पाटलांचे वर्चस्व संपुष्टात आणले होते. याचबरोबर नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीतसुद्धा विवेक कोल्हे यांनी महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात शिक्षक मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली होती. विशेष म्हणजे हि निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिष्ठेची करत जिंकलीही. याच कारणामुळे कोल्हे हे महसूलमंत्री विखे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीचे बळी ठरले असल्याची चर्चा राजकीय वातावरणात रंगली आहे.