कौशल्य शिक्षणाचा प्रवरा पॅटर्न इतर संस्थांनी स्विकारावा : पालकमंत्री विखे पाटील

0

 

अहमदनगर :- पदवी शिक्षणा बरोबरच कौशल्य प्रशिक्षणाच्या संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शिक्षण संस्थाचालकांना स्विकारावी लागेल. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेने  कौशल्य शिक्षणाकरीता ३७ कोर्सेस सुरू करून तयार केलेला प्रवरा पॅटर्न इतर संस्थांनी स्वीकारावा, असे  आवाहन  राज्याचे महसूल, पशुसंवर्धन,  दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. महसूल विभागाच्या वतीने शिक्षण प्रसारक संस्थेच्या संगमनेर महाविद्यालयात विद्यार्थ्याकरीता सुरू करण्यात आलेल्या आपले सेवा केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

   कार्यक्रमास संस्थेचे सचिव डॉ. अनिल राठी, उद्योजक साहेबराव नवले, प्रांताधिकारी शैलेंद्र हिंगे, तहसिलदार धीरज मांजरे, प्राचार्य अरूण गायकवाड  आदी प्रामुख्याने उपस्थित होते. पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की,विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले शासकीय दाखले  महाविद्यालयातच उपलब्ध व्हावेत या उद्देशाने जिल्ह्यातील काही शिक्षण संस्थामध्ये आपले सेवा केंद्र सुरू करण्याचा निर्णय  महसूल विभागाने घेतला असून राज्यातील पहिला प्रयोग अहमदनगरमधून सुरू झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

संगमनेर विभागाचे प्रांताधिकारी शैलेंद्र हिंगे यांच्या पुढाकारने याच महाविद्यालयात युवा ही दुवा ही संकल्पना राबवून शासनाच्या योजनेशी विद्यार्थ्याना जोडून घेण्याचा प्रयत्न यशस्वी झाला.आता आपले सेवा केंद्र महाविद्यालयात सुरू झाल्याने दाखल्या करीता विद्यार्थ्यांना बाहेर जावे लागणार नाही.शासकीय दरानेच विद्यार्थ्यांना दाखले मिळू शकतील. दाखल्याकरीता होणारी अर्थिक लूट थांबेल असेही त्यांनी यावेळी सांगितले. राज्य शासनाने  मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेतला असून या माध्यमातून प्रशिक्षण आणि रोजगारच्या संधी निर्माण करून दिल्या जाणार आहेत. मुलीकरीता व्यावसायिक शिक्षण मोफत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही ते यावेळी म्हणाले. 

    प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेने कौशल्य प्रशिक्षणा करीता ३७ कोर्सेस सुरू केले असल्याचे युवकांना या माध्यमातून कौशल्यावर आधारित  प्रशिक्षण घेता येणार आहे. संस्थेच्यावतीने प्रशिक्षण भत्ताही देण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

    देशात कौशल्य विकासाचा मोठा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून शिक्षण संस्थाना आता यापासून दूर जाता येणार नाही. संगमनेर महाविद्यालयाची पंरंपरा खूप मोठी असून शैक्षणिक गुणवता राखण्यात महाविद्यायाने मिळवलेला नावलौकीक पाहाता प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या धर्तीवर शिक्षण प्रसारक संस्थेने कौशल्य विकास प्रशिक्षणाला प्राधान्य द्यावे, असेही पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी अनिल राठी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते  प्रातिनिधीक स्वरुपात विद्यार्थ्याना शासकीय दाखले वितरीत करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here