तासगाव : द्विशिक्षकीशाळांच्या बाबतीत शासनाने उदासीन धोरण बाळगले आहे. प्रशासनानेही या शाळांकडे कानाडोळा केला आहे. त्याचा परिणाम या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत आहे.
तासगाव तालुक्यातील तब्बल २६ द्विशिक्षकी शाळांत ‘वर्ग चार अन् एकाच गुरुजींवर भार!’ अशी स्थिती आहे.
तासगाव तालुक्यात १४१ जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. त्यातील ८० शाळा द्विशिक्षकी आहेत. त्यापैकी तब्बल २६ द्विशिक्षकी शाळांवर एकच शिक्षक आहे. या २६ शाळांत पहिली ते चौथीपर्यंतच्या वर्गासाठी एकूण १४ विषयांच्या अध्यापनाचे काम, एकाच शिक्षकाला करावे लागते. त्यातच भर म्हणून प्रशासकीय काम, शासनाकडून येणारे नवे उपक्रम, त्याची अंमलबजावणी, वेबसाईटवर ऑनलाइन माहिती भरणे, ऑफलाइन नोंदी, शासकीय, प्रशासकीय स्तरावर मागविलेली माहिती देणे, अशा अनेक गोष्टींची कसरत शिक्षकाला करावी लागते. राज्य शासनाकडून द्विशिक्षकी शाळा बासनात गुंडाळण्याच्या हेतूनेच या शाळांवर शिक्षकांची नियुक्ती करण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप पालकांकडून होत आहे.
जुनी डोर्ली जिल्हा परिषद शाळेत पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग शिकवण्यासाठी तीन वर्षापासून एकच शिक्षक आहे. एकाच शिक्षकावर चार वर्गांचा भार, पुन्हा अशैक्षणिक आणि प्रशासकीय कामे, यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे. पाच सप्टेंबरपर्यंत दुसरा शिक्षक मिळाला नाही, तर शाळा बंद ठेवण्याचा ठराव ग्रामसभेत घेण्यात आला आहे. याबाबत गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. चार दिवसात शिक्षक मिळाला नाही, तर शाळा बंद ठेवण्यात येईल. – रवींद्र सदाकळे, सरपंच, डोर्ली.
तालुक्यातील रिक्त पदे असलेल्या द्विशिक्षकी नऊ शाळांमध्ये निवृत्त शिक्षकांची नेमणूक केली आहे. उर्वरित शाळांमध्येही लवकरच निवृत्त शिक्षकांची नेमणूक हाेईल. – आबासाहेब लावंड, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, तासगाव.
एकाच शिक्षकावर चार वर्ग सुरू असलेल्या शाळा आणि विद्यार्थी संख्या
रामपूर (अंजनी) – ९
गणेशनगर (बोरगाव) – १४
जाधव वस्ती, (चिंचणी) – ५
भवानी वस्ती (चिंचणी) – ९
माळीनगर (चिंचणी) – १७
कारखाना मळा, (चिंचणी) – १५
जुनी डोर्ली – १४
मंडले वस्ती (मांजर्डे) – १३
दिनकरदादा नगर (मांजर्डे) – २०
किंदरवाडी – १३
हजारवाडी (पेड) – १८
विठ्ठलनगर (पेड) – १६
कचरेवाडी (पेड) – ११
विठोबा मळा (पेड) – १७
अशोकनगर (जरंडी) – २
चव्हाण वस्ती (सिद्धेवाडी) – १८
सैनिक नगर (डोंगरसोनी) – २०
उभीखोरी (डोंगरसोनी) – २०
बसवेश्वरनगर( सावळज) – २१
मंडले वस्ती (हातनोली) – १४
गुरवकी ( विसापूर) – १४
सैनिक मळा (वायफळे) – २
तळे वस्ती (वायफळे) – १०
घोडके मळा (वायफळे) – १२
सावंत मळा (बस्तवडे) – १५
दुशारेकर – गायकवाड मळा (बस्तवडे) – १०
एकूण – ३६७ विद्यार्थी