![](https://www.pressalert.in/wp-content/uploads/2022/11/IMG-20221109-WA0078.jpg)
उरण दि १०(विठ्ठल ममताबादे )
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालय नविन पनवेल येथे गेली २५ वर्ष अध्यापनाचे नियमित कार्य करणारे, उरण तालुक्यातील धुतुम गावचे सुपुत्र सहा.शिक्षक साईनाथ बाळाराम पाटील यांना भाजपा शिक्षक आघाडी कोकण विभाग आयोजित “वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार गुणगौरव सोहळ्यात ‘आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. साईनाथ पाटील हे धुतूम गावचे रहिवासी असून सि.के.टी.शाळेतील एक अनुभवी कार्य कुशल, आणि कार्यतत्पर शिक्षक आहेत. हिंदी विषय अध्यापनात त्यांचे प्रभुत्व आहे. आपल्या अध्यापनाच्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांमध्ये हिंदी विषयात गोडी निर्माण करण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतात. त्यामुळे ते विद्यार्थी प्रिय शिक्षक आहेत. त्यांच्या या पुरस्काराने सी.के.टी. विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्यामुळे संपूर्ण सी.के.टी. संकुलात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
संस्थेचे चेअरमन रामशेठ ठाकूर , व्हाईस चेअरमन वाय टी देशमुख , अध्यक्ष अरुण शेठ भगत , संचालक मंडळ, सचिव एस टी गडदे, सहसचिव भाऊसाहेब थोरात , प्राचार्य, संकुलातील मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, पर्यवेक्षिका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी या सर्वांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
मंगळवार (दि.८) रोजी ठाणे येथे पार पडलेल्या या गुणगौरव सोहळ्यास विनयजी सहस्रबुद्धे,ना.रवींद्रजी चव्हाण सार्वजनिक बांधकाम अन्न नागरी पुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई,पालकमंत्री पालघर व सिंधुदुर्ग, विकास पाटील प्रदेश सहसंयोजक भाजप शिक्षक आघाडी, विनोद भानुशाली प्रदेश आयटी सेल भाजपा शिक्षक आघाडी, सचिन मोरे संयोजक भाजपा शैक्षणिक संस्था प्रकोष्ठ ठाणे, अँड निरंजनजी डावखरे आमदार कोकण पदवीधर मतदार संघ, जिल्हाध्यक्ष भाजपा, ठाणे जिल्हा इत्यादी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत हा गुणगौरव सोहळा संपन्न झाला.