पाडेगावातील शेतकऱ्याने घेतले आल्याचे विक्रमी उत्पादन; एकरी 45 क्विंटल घेत केली लाखोंची कमाई

0

लोणंद : पाडेगाव (ता. फलटण) येथील शेतकरी रमेश विठ्ठल अडसूळ  यांनी आल्याचे एकरी ४५ क्विंटल इतके विक्रमी उत्पादन घेऊन लाखोंची कमाई केली आहे.
आधुनिक तंत्रज्ञान व माहितीचा वापर करून शेती करण्यावर त्यांचा भर असल्यामुळे ते अन्य शेतकऱ्यांपेक्षा चांगले उत्पादन काढून किफायतशीर शेती करत आहेत.

अडसूळ यांना पाडेगाव तरटीचामळा (ता. फलटण) येथे वडिलोपार्जित साडेआठ एकर जमीन आहे. ते आपल्या शेतात सातत्याने नवनवीन प्रयोग करत असतात. नायगाव (ता. खंडाळा) येथील बाबासाहेब नेवसे यांचे मार्गदर्शनानुसार त्यांनी पारंपरिक ऊसपिकाला फाटा देऊन दीड एकरावर आले पिकाची लागवड केली. पहिल्या वर्षी त्यांनी सर्व आले बियाणे म्हणून विक्री केले. तर यावर्षी त्यांना एकरी ४५ टन इतके विक्रमी उत्पादन मिळाले आहे. एका गुंठ्यात ११०० ते ११५० किलो आले मिळत आहे.

बाजारात सध्या आल्याच्या किमती खाली आल्या आहेत. ३० रुपयांपासून ६५ रुपयांपर्यंत प्रतवारीनुसार प्रतिकिलोला भाव मिळत आहे. त्यानुसार त्यांना आले पिकातून एकरी सतरा लाख रुपयांचे उत्पादन मिळाले आहे. एकरी सहा लाख रुपयेप्रमाणे दीड एकरासाठी त्यांनी ९ लाख रुपये उत्पादन खर्च केला आहे. खर्च वजा जाता त्यांना आले पिकातून एकूण एकरी ११ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे.

अन्य पिकांपेक्षा तो कितीतरी पटीने अधिकचा आहे. जिल्ह्यात आजवर एकरी ४२ ते ४३ क्विंटलपर्यंत आले उत्पादनाचा विक्रम आहे. मात्र, रमेश अडसूळ यांनी एकरी ४५ टन उत्पादन घेऊन जिल्ह्यात आले उत्पादनात आणखी एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. अनेक शेतकरी आमच्या पाडेगाव येथील आल्याच्या प्लॉटला भेट देऊन माहिती घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here