सातारा/अनिल वीर : तेजज्ञान ग्रंथ रथाचे आगमन सातारा नगरीत झाले आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजेंद्र माने यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
तेजज्ञान फाऊंडेशन अर्थात, हॅपी थॉटस या आध्यात्मिक संस्थेचे संस्थापक सरश्री यांची ४०० हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. वाचन संस्कृती आणि ज्ञानलालसा जोपासण्याच्या उद्देशाने तेजज्ञान फाउंडेशन अर्थात हॅपी थॉटस् संस्थेच्यावतीने महाराष्ट्र भ्रमणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात तेजज्ञान ग्रंथ रथाचे आगमन सातारा येथे झाले.
डॉ.राजेंद्र माने म्हणाले,” हॅपी थॉट्स म्हणजे जीवन जगण्याचा सकारात्मक विचार करणे. बदलता भोवताल जागतिकीकरण आणि थोड्याफार अर्थाने सर्वच प्रकारात येणारे सपाटीकरण याने सर्वसामान्य माणसाच्या जगण्यावर एक विचित्र ताण येत असतो.अशावेळी सकारात्मक विचार करत जगण्याला सुगंध देणे हे महत्त्वाचे असते. हे परिवर्तन माणसात घडायचे असेल तर त्यासाठी हॅपी थॉट सारखी विचारसरणी मदत करणारी आहे.याला आधार देणारी आणि विचार देणारी हॅपी थॉट्सची अनेक विविध पुस्तके आहेत.एक चांगला विचार सुद्धा समृद्ध , सजग जगण्याचा मार्ग निर्माण करू शकतो. या ग्रंथ यात्रेतले ग्रंथ माणसाचे आयुष्य आनंदी परिपूर्ण समृद्ध करायला नक्कीच मदत करतील त्याचा लाभ सर्वांनी घ्यायला हवा. तरी या ग्रंथ रथाच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांच्या सर्वांगीन विकासासाठी अत्यंत उपयुक्त असलेली पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध केली आहेत. त्याचा लाभ सातारा शहरातील नागरीकांनी घ्यावा.” या प्रसंगी बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर यांना पुस्तक भेट देण्यात आली. सदरच्या कार्यक्रमास वाचक व साधक उपस्थित होते.