बामणोली : कोयना धरण शंभर टक्के भरले असून शिवसागर जलाशय पाण्याने पूर्ण क्षमतेणे भरला असून स्थानिक व्यवसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. बामणोली येथील शिवसागर जलाशय पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे बोट व्यवसाय सुरळीत होणार असून त्यावर अवलंबून असणाऱ्या व्यवसायिकांना दिलासा मिळाला आहे.
पाण्याची पातळी पुर्ण झाली तरच बोट व्यवसाय सुरळीत सुरू होईल व त्यांवर आधारीत सर्व छोटे मोठे उद्योग धंदे सुरू होतील, अशी आशा बामणोली येथील व्यवसायिकांमध्ये आहे.
कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे वर्षभराची वीज निर्मिती, पिण्याच्या पाण्याची, सिंचनाची चिंता मिटली आहे. कोयना धरणात महाबळेश्वरपासून ते कांदाटी खोऱ्यातील दुर्गम भागामधून लहान मोठ्या ओढया नाल्या मधून पाण्याचा मोठा प्रवाह नदीमध्ये विलीन होत असतो.
कोयना धरणाच्या भिंतीपर्यंत पसरलेला हा सर्व भाग सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रात येत आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जंगल आहे.
कोयना जलाशय परिसरामध्ये सातत्याने पाऊस होत असतो. त्यामुळे कोयना धरण परिसर हा पावसाचे आगार मानला जातो. बामणोली हे जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असून या ठिकाणी सातत्याने पर्यटकांची वर्दळ असते.
शिवसागरच्या सौंदर्याची पर्यटकांना भुरळ
बामणोली येथील पाण्यातील जुन्या बोट क्लबची इमारत ही पाण्याखाली गेली असून बामणोली येथील काही घरांना देखील शिवसागराचे पाणी लागले आहे.
सध्या विशाल शिवसागराचे सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालत आहे. त्यामुळे आठवडयाच्या सुट्टी निमित्ताने शनिवार व रविवारी पर्यटक बामणोली येथे बोटिंगसाठी मोठया प्रमाणावर गर्दी करत आहेत.