नांदेड – प्रतिनिधी
किसान जन आंदोलन भारत चे संस्थापक सचिन कासलीवाल यांच्या पुढाकारातून येत्या २३ सप्टेबर सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेडवर शेतकरी धडक मोर्चा चे आयोजन कॉ. डॉ. अण्णा भाऊ साठे चौकापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत दु. १२.०० वाजता करण्यात आले आहे तरी लाखोच्या संख्येने मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन किसान जन आंदोलन भारत च्या वतीने सचिन कासलीवाल यांनी केले आहे.
या धडक मोर्चाव्दारे शेतकरी राजा जागा हो, संघर्षाचा धागा हो अशी घोषणा देत शेतकऱ्यांच्या विविध मागण्या प्रशासनासमोर मांडण्यात येणार आहेत यात पिक संरक्षण कायदा करण्यात यावा , शेतकरी व पिकाच्या संरक्षणासाठी वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करणे, जमिनीच्या मुल्यांकनाच्या किमान ५०% पिक कर्ज द्या. पिक कर्ज परतफेडीचा कालावधी १० वर्ष करणे तसेच आधारभूत किंमतीवरील सोयाबीन खरेदी केंद्र तातडीने कार्यान्वित करणे व कापूस खरेदी करीता ते १ आक्टोबर २०२४ पुर्वी सुरु करा आणि पंतप्रधान पिक विमा योजनेचा क्लेम मंजूर झाला तर क्लेम रक्कम त्याच हंगामात द्या , झिरो बॅलन्स वर बचत खाते काढण्याचा शेतकऱ्यांना अधिकार द्या.
तसेच शेतकऱ्यांचे बचत खाते होल्ड करु नका, ऊस लागवड व तोडणी प्रोग्राम ऑनलाइन करून उस कारखान्याची दादागिरी संपवा व फळे-भाजीपाला बाजारातील एकसारख्या गुणवत्तेच्या मालाचा भाव फरक, वजन वजावट, कमीशन इ. रद्द करा आणि शेतमाल विक्री नंतर पैसे (पट्टी) त्याच दिवशी द्या.व पेस्टीसाइड व केमिकल मधील ५००% पर्यंतची नफाखोरी संपवा अशा अनेक शेतकरी हिताच्या मागण्यासह हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे तरी या मोर्चात शेतकऱ्यांनी लाखोच्या संख्येने सहभाग नोंदवून आपला आक्रोश व्यक्त करावा असे आवाहन आयोजक सचिन कासलीवाल यांनी केले आहे