माय मराठीसाठी सोन्याचा दिवस : – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0

आजचा दिवस मराठी भाषा गौरव दिन

मुंबई:- आजचा दिवस मराठी भाषा आणि मराठीवर  प्रेम करणाऱ्यांसाठी सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा ऐतिहासिक आहे. जगभरात, सातासमुद्रापार पोहचूनही तिथे मराठी भाषा, सणवार उत्सव जोपासणाऱ्यांसाठी गौरवाचा, अभिमानास्पद दिवस आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. यासाठी त्यांनी राज्यातील जनतेचे अभिनंदन केले आहे.  केंद्रीय मंत्रीमंडळाच्या या निर्णयाचे स्वागत करतानाच, मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी राज्यातील मराठी प्रेमी, तसेच साहित्यिक, संशोधकांनी केलेल्या प्रयत्नांचेही कौतुक केले आहे. आजचा हा दिवस यापुढे ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. 

मुख्यमंत्र्यांनी संत ज्ञानेश्वरांच्या माझा मराठाचि बोलु कौतुके। परि अमृतातें ही पैजा जिंके ।।  या ओळींचाही दाखला दिला आहे. ते म्हणतात, अखेर माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने एका लढ्याला यश आले. यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे सतत पाठपुरवठा केला होता. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठीला हा दर्जा मिळावा यासाठी आग्रह धरला होता. त्यांच्यासाठी हा निर्णय म्हणजे स्वप्नपूर्ती आहे . निती आयोगाच्या बैठकीतही मराठीला अभिजात दर्जा द्यावी अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केली होती. या निर्णयामुळे आपल्या प्रदीर्घ लढ्याला यश मिळाले आहे.

मराठी माणसांच्या जिव्हाळ्याचा हा निर्णय आदिशक्तीच्या नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी घेतला गेल्याने दुधात साखर असा योग जुळून आला आहे. यासाठी आपल्या लाडक्या मराठीचा यथोचित सन्मान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचे आभार मानतो. मराठी भाषा प्रगल्भ आहेच. आता तिचा प्रचार, प्रसार आणखी जोमाने करता येईल. मराठी भाषा आपल्या संतांनी जतन केली, वाढवली. तिचा आपण व्यवहारात आवर्जून वापर केला पाहिजे, असे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी मराठीला अभिजात दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न करणाऱ्या मराठी भाषक, विचारवंत, भाषा अभ्यासक- संशोधक, साहित्यिक आणि समीक्षक अशा सर्वांचे आभार मानले आहेत. 

This image has an empty alt attribute; its file name is kolhe-1.jpg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here