किल्ले प्रतापगडावर उद्या भव्य मशाल महोत्सव सोहळा…

0

प्रतापगङ प्रतिनिधी

 ऐतिहासिक किल्ले प्रतापगडावर उद्या मंगळवार दि . ८ /१०/ २०२४ रोजी रात्री ठिक ८:३० वाजता भव्य मशाल महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या वर्षी आई भवानी मातेच्या स्थापनेला ३६५ वर्ष पूर्ण होत असल्याने३६५ मशाली प्रज्वलीत होणार असल्याने यंदाचा उत्सव विशेष महत्त्वाचा ठरणार आहे. या निमित्ताने ऐतिहासिक किल्ले प्रतापगडावर मशाल महोत्सवात सर्व शिवभक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

   

छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने प्रसिद्ध असलेल्या ऐतिहासिक प्रतापगडावर शिवरायांनी भोरप्या डोंगराला तटा-बुरुजांचे शेला पागोटे चढवून स्वराज्यावर चालुन आलेल्या उन्मत्त अफझल खानाचा येथेच कायमचा काटा काढला होता. या स्फूर्ती दायी घटनेचे स्मरण म्हणून शिवरायांनी प्रतापगडावर आई भवानी मातेचे मंदिर बांधून त्या ठिकाणी आदिशक्तीची स्थापना केली होती व आहे .

    राजमाता कल्पना राजे भोसले व छ . शिवाजी महाराजांचे थेट १३वे वंशज श्रीमंत छत्रपती उदयन राजे भोसले यांच्या देखरेखी खाली प्रतापगडावर दर वर्षी भवानी मातेचा नवरात्रोत्सव धुमधडाक्यात साजरा होत असतो. २०१० साली आई भवानीच्या स्थापनेला ३५० वर्ष पूर्ण झाले होते. त्या निमित्ताने प्रतापगड येथील स्थानिक भूमिपुत्र चंद्रकांत (आप्पा) उतेकर यांच्या संकल्पनेतून प्रतापगडावर प्रथम २०१० साली ३५० मशाली प्रज्वलित करून मशाल महोत्सवाची सुरुवात झाली होती.

     

 या वर्षीही चतुर्थी ला साजरा होणार्या मशाल महोत्सवास शिवभक्तांची दरवर्षी मोठ्याप्रमाणात वाढत असलेली उपस्थिती लक्षात घेउन मशाल महोत्सव समितीने कार्यक्रमात बदल केला असुन चतुर्थीला आई भवानी मातेचा गोंधळ आणि पंचमीला ललीतपंचमी तसेच शष्ठीला मंगळवार दि.८/१०/२०२४ रोजी रात्री ८:३० वाजता शेकडो मशाली एकाच वेळी प्रज्वलित करण्यात येणार आहेत. या महोत्सवात मशाली प्रज्वलन, ढोल ताशा समुह वादन, फटाक्यांची आतषबाजी, गोंधळ, जागरण तसेच कार्यक्रमासाठी येणार्या भाविक, शिवभक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजनही केले जाते.

   जेव्हा मशाली प्रज्वलित होतात, त्यावेळी साक्षात शिवकाळ आवतरल्याचे वाटते. हा शिवकाळ अनुभवण्यासाठी शिवभक्तांनी, भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मशाल महोत्सव समिती कडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here