विश्वगुरू व्हायचे असेल तर स्वत:ला बदलावे लागेल – नितीन गडकरी

0

सांगली : आत्मनिर्भर भारत, फाईव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी, थर्ड लार्जेस्ट इकॉनॉमी, विश्वगुरु हे सर्व म्हणायला सोपे आहे, पण त्यासाठी आपल्याला बदलायला हवे. दुसऱ्याला सांगण्यापेक्षा बदल स्वत:मध्ये करायला हवेत. यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अंगीकार करावा लागेल, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

मराठा समाज संस्थेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शुक्रवारी सांगलीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण व सभागृह नुतनीकरण कामाचे उद्घाटन गडकरी यांच्याहस्ते करण्यात आले. स्मरणिका प्रकाशनही पार पडले. गडकरी म्हणाले की, सत्ता, संपत्ती अन् सुख पायाशी लोळण घालत असतानाही उपभोगशून्य असलेल्या शिवाजी महाराजांनी रयतेच्या उद्धारासाठी व विकासाकरीता सेवा केली. त्यांचा आदर्श सर्वांनी घेतला तर आपला समाज व देश आता आहे त्यापेक्षा अनेक पटीने पुढे जाईल.

ते म्हणाले, कोणताही व्यक्ती हा जात, धर्म, लिंग यानुसार छोटा किंवा मोठा होत नाही. त्याच्यातील गुणांनी तो मोठा होत असतो. शिवाजी महाराज म्हणजे गुणांचा भांडार होते. सर्वांना बरोबर घेऊन कसे राज्य करायचे, याचा आदर्श वस्तुपाठ त्यांनी घालून दिला. त्यांच्या विचारांचा वारसा सर्वांनी जपला पाहिजे.

मराठा समाज संस्थेचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी स्वागत, तर निमंत्रक माजी खासदार संजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार विशाल पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार विश्वजीत कदम, माजी आमदार विलासराव जगताप, सदाशिवराव पाटील, दिनकर पाटील, नितीन शिंदे, शिवाजीराव नाईक, रासपचे नेते महादेव जानकर, माजी खासदार राजू शेट्टी, पृथ्वीराज पवार, जनसुराज्य पक्षाचे समीत कदम आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here