येवला (प्रतिनिधी)
भारतातीलच नव्हे तर जगातील तमाम प्रकारच्या गुलामांना गुलामीतून मुक्तीची वाट डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ८९ वर्षांपूर्वी येवला येथे ऐतिहासिक धर्मांतराची क्रांतिकारी घोषणा देऊन केली म्हणून येवला क्रांतिकारी-परिवर्तनवादी चळवळीचा पाया असलेली भूमी असून मुक्तिभूमी हे मानव मुक्तीचे केंद्र आहे असे मत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे वंशज सचिन साठे (नातू) यांनी व्यक्त केले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी सार्वजनिक वाचनालय,राष्ट्रीय महाकवी वामनदादा कर्डक मुक्तिभूमी अभ्यासिकेस सचिन साठे यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते.
शेतकरी, कामगार,कष्टकरी, मजूर,गोरगरिबांच्या मुला-मुलींसाठी ज्ञानाचे केंद्र मुक्तिभूमी वाचनालय-मुक्तिभूमी अभ्यासिका बनावी अशी अपेक्षा त्यांनी ह्यावेळी बोलतांना व्यक्त केली.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी सार्वजनिक वाचनालय तथा राष्ट्रीय महाकवी वामनदादा कर्डक मुक्तिभूमी अभ्यासिकेचे संस्थापक शरद शेजवळ यांनी प्रास्ताविक केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक प्रा.डॉ.जीभाऊ मोरे हे होते.डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती व येवला मर्चंड बँकेचे संचालक सुभाष गांगुर्डे,अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संतोष खैरनार,शैलेंद्र वाघ,भगवान चित्ते,जालिंदर खैरनार हे उपस्थित होते.सूत्रसंचालन राजरत्न वाहुळ तर गायत्री खोकले हिने आभार मानले,वसतिगृह अधीक्षक बी.डी.खैरनार,वसंत पवार,सिध्दार्थ गरुड,मानव जाधव,रवी गरुड,राहुल गायकवाड,जगदीश वेंधे,हेमंत पवार,अजिंक्य पवार,प्रवीण गायकवाड आदी वाचनालयातील वाचक विद्यार्थी उपस्थित होते.