परळी पशुवैद्यकीय दवाखान्यातर्फे लाळ्या खुरकत जनजागरण रॅली

0

काळोशी येथील कार्यक्रमात अधिकारी, कर्मचाऱ्यांसह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग 

सातारा /प्रतिनिधी :  परळी (ता. सातारा) येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ च्या माध्यमातून लाळ्या खुरकत रोग नियंत्रण जनजागृती उपक्रम नुकताच साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने लसीकरण मोहिमेचा प्रारंभ व काळोशी (ता. सातारा) येथे सजवलेल्या पशुधनासमवेत मान्यवरांच्या उपस्थितीत व ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागातून मिरवणूक काढण्यात आली.

   

जागतिक प्राणी दिनाचे औचित्य साधून परळी पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ चे  पशुधन विकास अधिकारी (गट अ) डॉ. निलेश शिंदे यांच्या संकल्पनेतून जिल्हा पशुसंवर्धन उप आयुक्त डॉ. दिनकर बोर्डे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार, सातारा पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. ए. पी. चपने, जिल्हा परिषदेचे पशुधन विकास अधिकारी (तांत्रिक) डॉ. विजय सावंत, निवृत्त पशुधन विकास अधिकारी डॉ. दीपक माने, पशुवैद्य डॉ. संदीप जाधव, सरपंच संजय निकम, सर्जा राजा गोशाळेचे संस्थापक संतोष निकम, पशुधन पर्यवेक्षक सुभान गौरवे, वानोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत काळोशी प्राथमिक शाळेच्या आवारात लसीकरण करण्यात येऊन या कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.  त्यानंतर गावातील शेतकरी व युवा मंडळींच्या सहभागातून वाद्य पथकाच्या गजरात सजवलेल्या पशुधनासमवेत गावातून रॅली काढण्यात आली. पशुसंवर्धन विभागाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी ही सजवलेल्या बैलगाडीतून या रॅलीत सहभागी झाले होते. त्यानंतर वाघजाईदेवी मंदिराच्या प्रांगणात मार्गदर्शनपर सभा झाली. त्यामध्ये मान्यवरांनी लाळ्या खुरकत लसीकरण मोहिमेबरोबरच लंपी, गोचीड व जंत निर्मूलनासाठीची सविस्तर माहिती दिली. तसेच यावेळी उपस्थित मान्यवरांचे व पदाधिकारी कार्यकर्ते यांचेही सत्कार करण्यात आले. 

जनावरांच्या लसीकरणाबाबत दुर्लक्ष करू नये, तसेच जनावरांना लसीकरणामुळे त्रास होतो, अशा अफवांना बळी पडू नये, असे आवाहन यावेळी विविध वक्त्यांनी केले. लाळ्या खुरकत आजारामुळे पशुधन नष्ट होऊन देशाचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या 20,000 कोटींचे नुकसान होत आहे. त्यामुळे लाळ्या खुरकत आजारांवर 2025 पर्यंत नियंत्रण आणण्याबरोबरच सन 2030 पर्यंत समूळ उच्चाटन करायचे अशा उद्देशाने केंद्र व राज्य शासनाने पशुपालकांचे नुकसान टाळण्याबरोबरच शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता प्राप्त व्हावी व जनावरांचे मृत्यू टाळावेत या उद्देशाने लाळ्या खुरकत लसीकरण व पशुचिकित्सा मोहीम राबवण्याचे ठरवले आहे, अशी माहिती यावेळी विविध वाक्यांनी दिली. दरम्यान रॅलीत सहभागी झालेल्या व सभेस

उपस्थित पशुपालक शेतकरी व ग्रामस्थांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले तसेच आपले पशुधन जपुया असा संकल्पही केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पशुधन विकास अधिकारी (गट अ)डॉ. निलेश शिंदे, सहाय्यक संपत गायकवाड यांच्यासह पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच काळोशीचे सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व प्रमुख ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.  या उपक्रमाबद्दल अनेकांनी समाधान व्यक्त केले असून अशा लसीकरण मोहिमा व जनजागृती रॅलीचे कार्यक्रम गावोगावी व्हावेत, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here