कराडजवळ 3 कोटींची रोकड लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

0

कराड : पुणे-बंगळुरू महामार्गावर मलकापुरातील ढेबेवाडी फाट्यावर कारमधील तीन कोटींची रक्कम लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात कराड शहर पोलिसांना यश आलं आहे. टोळीचा म्होरक्या हा कराडमधील असून तो रेकॉर्डवरील गुंड आहे.
तसेच अन्य काही संशयित कोयना काठच्या गावातील आहेत. गुन्ह्यात वापरलेली वाहने, लुटलेल्या रक्कमेतील निम्मे पैसे आणि दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात आहेत. मुख्य संशयिताच्या तपासासाठी पथके रवाना झाली आहेत.

खटाव तालुक्यातील निमसोड गावचा शैलेश घाडगे व अविनाश घाडगे हे दोघेजण विंग (ता. कराड) येथील अवधूत कणसे यांच्या कारवर चालक म्हणून काम करतात. या कारमधून तीन कोटींची रक्कम मुंबईहून हुबळीला नेण्यात येत होती. सोमवारी रात्री शैलेश घाडगे व अविनाश घाडगे हे दोघेजण संबंधित कारमधून तीन कोटी रुपये घेऊन हुबळीकडे निज्ञाले असताना मध्यरात्री ढेबेवाडी फाटा येथे त्यांची कार अडवून चौघांनी कारची हॉकी स्टिकने काच फोडली. शैलेश यास चाकूचा धाक दाखवत मारहाण केली. त्यानंतर कार घेऊन संशयित विंग गावच्या दिशेने पळाले.

कुरीयर कंपनीच्या कारमधील तीन कोटींची रक्कम संशयितांनी आपल्या कारमध्ये घेऊन घटनास्थळावरून पलायन केले. संशयितांच्या टोळीचा म्होरक्या हा कराडमधील सराईत गुंड असल्याचे तपासात समोर आले आहे. दरम्यान, पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून महत्वाची माहिती हाती लागली आहे. ७ अधिकारी आणि ४२ पोलीस कर्मचारी या गुन्ह्याचा तपास करत आहेत. सहा पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाली आहेत.

तीन कोटींच्या लुटीचा पर्दाफाश झाल्यानंतर संशयितांची नावे समोर आली. त्यानंतर पोलिसांनी कोयनाकाठच्च्या एका मोठ्या गावातील दोन संशयितांना ताब्यात घेतलं आहे. गुन्ह्यात वापरल्याचा संशय असलेली दोन वाहने तसेच लुटीतील काही रक्कमही पोलिसांनी संशयितांकडून ताब्यात घेतली आहे.

अतिरिक्त पोलीस अधीक्षक कराडमध्ये तळ ठोकून

ही घटना घडल्यापासून पोलीस अधीक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कराडमध्ये तळ ठोकून आहेत. डीवायएसपी अमोल ठाकूर, एलसीबीचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर, कराड शहर डीबीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर आणि पोलिसांची पथके दिवस-रात्र तपास करत आहेत. वरिष्ठ अधिकारी आज या गुन्ह्याचा तपशील जाहीर करणार आहेत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here