सोलापूर : विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आज 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपने विद्यमान आमदारांनाच पुन्हा संधी दिली असून लोकसभा निवडणुकीतील निकालाला घाबरत नवीन चेहरे देण्याचे कटाक्षाने टाळले आहे.
भाजपच्या पहिल्या यादीत पश्चिम महाराष्ट्रातील 16 उमेदवारांचा समावेश आहे. त्यात दोन ठिकाणी फक्त नवीन चेहरे देण्यात आले असून चौदा मतदारसंघातून पुन्हा विद्यमान आमदारांनाचा संधी दिली आहे.
भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून बाजी मारली आहे. मात्र, भाजपने प्रस्थापितांना नाकारण्याचे धाडस दाखवलेले नाही. लोकसभा निवडणुकीप्रमाणे पुन्हा एकदा विद्यमान आमदारांवरच भाजपने पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. आता विद्यमान आमदारांपैकी किती आमदार पुन्हा एकदा विधानसभा जाण्यात यशस्वी ठरतात, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
भाजपच्या 99 उमेदवारांपैकी 16 उमेदवार हे पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. त्या पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक सहा जागांचा असून त्या खालोखाल सोलापूर, सातारा जिल्ह्यांतील तीन, तर कोल्हापूर आणि सांगलीमधील प्रत्येकी दोन जागांचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. यात पुणे जिल्ह्यातील दौंड, चिंचवड, भोसरी, पर्वती, शिवाजीनगर, कोथरुड मतदारसंघाचा समावेश आहे.
सोलापूरमधील सोलापूर शहर उत्तर, सोलापूर दक्षिण आणि अक्कलकोट मतदारसंघाचा, तर कोल्हापूरमधील कोल्हापूर दक्षिण, इचलकरंजी, सांगलीतील मिरज आणि सांगली शहर, तर सातारा जिल्ह्यातील सातारा, माण आणि कराड दक्षिणमधील मतदारसंघांचा समावेश आहे. उर्वरीत जागा पुढील यादीत जाहीर होण्याची शक्यता आहे.
उमेदवारी जाहीर; भाजपने भाकरी फिरवण्याचे टाळले
पुण्यातील दौंडमधून राहुल कुल, भोसरीतून महेश लांडगे, शिवाजीनगरमधून सिद्धार्थ शिरोळे, कोथरुडमधून चंद्रकांत पाटील, पर्वतीमधून माधुरी मिसाळ या विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली आहे. केवळ चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांचे तिकिट कापून त्यांचे दीर शंकर जगताप यांना संधी दिली आहे, त्यामुळे केवळ चिंचवडमध्ये नवीन चेहरा देण्यात आलेला आहे.
सोलापूर जिल्ह्यात सोलापूर शहर उत्तरमधून माजी पालकमंत्री विजकुमार देशमुख यांना, तर सोलापूर दक्षिणमधून माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना, अक्कलकोटमधून भाजपचे सोलापूर जिल्हाध्यक्ष, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवण्यात आलेला आहे.
साताऱ्यामध्ये माणमधून पुन्हा एकदा जयकुमार गोरे, साताऱ्यातून छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, कराड दक्षिणमधून अतुल भोसले यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यामध्ये गोरे आणि भोसले हे विद्यमान आमदार आहेत, तर अतुल भोसले यांनी मागील निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती.
कोल्हापूरमधील कोल्हापूर दक्षिण मतदासंघातून अमल महाडिक यांना, इचलकरंजीतून राहुल प्रकाश आवाडे यांना उमेदवारी दिली आहे. महाडिक यांचा मागील निवडणुकीत पराभव झाला होता. इचलकरंजीतून प्रकाश आवाडे यांच्याऐवजी त्यांचे सुपुत्र राहुल यांना तिकिट देण्यात आले आहे. प्रकाश आवाडे यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला होता.
मराठवाड्यात दोन नव्या चेहऱ्यांना संधी, तर विद्यमान सगळे आमदार पुन्हा रिंगणात!
सांगली जिल्ह्यातून मिरज मतदारसंघातून विद्यमान कामगार मंत्री सुरेश खाडे, तर सांगलीतून विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे, त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातून केवळ दोन ठिकाणी नवे चेहरे देण्याचा प्रयत्न भाजपकडून झालेला आहे. इतरत्र चौदा ठिकाणचे उमेदवार हे विद्यमान आमदारच आहेत.