कलेढोण : खटाव तालुक्यातील एनकुळ येथे ढोले वस्तीवरील अर्जुन पांडुरंग ढोले यांच्या घरात गॅस सिलिंडर सुरू केला असता अचानक रेग्युलेटरमधून जाळ झाला, अशातच दहा मिनिटांत सिलिंडरचा स्फोट झाल्याने ऐन दिवाळीत संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले.
गुरुवारी रात्री ढोले यांनी नवीन आणलेली सिलिंडरची टाकी जोडली आणि लायटरने शेगडी पेटवल्यानंतर टाकीच्या रेग्युलेटरजवळ जाळ झाला. सावधानता बाळगल्याने पती-पत्नींनी भीतीपोटी घराबाहेर पळ काढला. नंतर दहा मिनिटांतच टाकीचा स्फोट झाला.
स्फोटाचा आवाज झाल्याने लोकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आग विझविवण्याचा प्रयत्न केला. ऐन दिवाळीत ही दुर्घटना घडल्याने या कुटुंबावर चांगलेच आर्थिक संकट ओढले आहे. गॅसच्या स्फोटाने कौलाच्या ठिकऱ्या उडाल्या. जुन्या काळातील दगडी भिंतीला तडे गेले.
या घरातील कुटुंबाने सावधानता बाळगून घरातून पळ काढल्याने जीवितहानी टळली आहे. या घटनेत दोन लाखांचे नुकसान झाले आहे. या घटनास्थळी गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी भेट दिली असून वडूज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार गणेश शिरकुळे आणि शिवाजी खाडे तपास करीत आहेत.
डाव्या डोळ्याला इजा..
सिलिंडरचा स्फोट झाल्याने सर्व कौलाच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या असून त्यातील एक तुकडा उडून घरमालक अर्जुन ढोले यांच्या डाव्या डोळ्याच्या बाजूला लागल्याने जखमी झाले आहेत.