महाबळेश्वर दि १ प्रतिनिधी : गेली अनेक दिवस महाबळेश्वरकर प्रतिक्षा करीत असलेला वेण्णालेक बायपास पुलाचे बांधकाम लवकरच सुरू करण्यात येणार असुन ज्या ठिकाणी हा पुल बांधण्यात येणार आहे. त्या स्थळाची पाहणी सार्वजनिक बांधकाम विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या दोन्ही विभागाच्या प्रमुख अधिकारी व बांधकाम ठेकेदार यांनी केली आहे एप्रिल अखेर या पुलाचे बांधकाम तयार होवुन महाबळेश्वर येथील प्रेक्षणीय पर्यटन स्थळात या सुंदर व आकर्षक पुलाची भर पडणार आहे
महाराष्ट्राचे नंदनवन म्हणुन प्रसिध्द असलेल्या महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणी पुर्वी दिवाळी नाताळ व उन्हाळा या तीन हंगामात गर्दी होत असे परंतु आता देशात पर्यटनाचा ट्रेंड बदलला आहे विकेंड अथवा सलग सुट्ट्या लागल्या की लोक पर्यटनासाठी बाहेर पडतात. त्यामुळे प्रत्येक विकेंडला महाबळेश्वर येथे पर्यटकांची गर्दी होते. या गर्दीमुळे महाबळेश्वर पांचगणी या दरम्यान मोठया प्रमाणावर वाहतुक कोंडी होते. विषेश म्हणजे ही वाहतुक कोंडी महाबळेश्वर येथील वेणालेक येथे मोठया प्रमाणावर होवुन अनेक वाहने या कोंडीमध्ये अडकतात. केवळ वेण्णालेक ते महाबळेश्वर या दोन कि मी अंतरासाठी कधी कधी एक ते दिड तास वेळ वाया जातो. ही समस्या सोडविण्यासाठी वेण्णालेक ते महाबळेश्वर या दरम्यानची वाहतुक एकेरी करून वाहतुक कोंडी सोडविण्यात येणार आहे .त्या साठी वेण्णालेक येथुन बायपास रोड तयार करण्यात येणार आहे. या बायपास रोडवर वेण्णालेक येथे पुल बांधावा लागणार असुन पुल व अप्रोच रोड या दोन्ही कामासाठी २५ कोटीचा निधी मंजूर झाला आहे.
वेण्णालेक येथे कमानी पुल बांधण्यात येणार आहे हा पुल सुंदर आणि आकर्षक असणार असुन या पुलावरून पर्यटकांना परीसरातील निसर्ग पाहता येणार आहे विशेष म्हणजे पावसाळी पर्यटन नजरे समोर ठेवुन 30 मिटर उंच अशी या पुलाची रचना करण्यात आली आहे. या पुलावरून वाहतुकीसाठी रस्ता व पर्यटकांसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजुला सात फुट रुंद फुटपाथ असेल आणि या फुटपाथ वरून पर्यटकांना पर्यटनाचा आनंद लुटता येणार आहे. हा कमानी पुलाचे दृश्य दुरून देखिल पर्यटकांना आनंद देईल असा विश्वास सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी अजय देशपांडे यांनी व्यक्त केला.
ज्या ठिकाणी पुल बांधण्यात येणार आहे त्या स्थळाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपविभागीय अभियंता सुरेश शिंदे तारल सार्वजनिक बांधकाम विभागाचे ज्युनियर इंजिनियर जीतमल पलाडीया तसेच बांधकाम ठेकेदार विक्रम कुराडे यांनी भेट दिली या ठिकाणी येणाऱ्या अडचणीवर चर्चा करून त्यातुन मार्ग काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला पुर्णपणे सहकार्य करणार आहे असेही देशपांडे यांनी सांगितले