आदर्श लोधवडे गावात सतेशकुमार माळवे यांच्या पुढाकाराने वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम
गोंदवले – दीपावली सुट्टीत बालचमूनां किल्ले बनविण्यात खूप मोठा आनंद असतो. या सणाला मुलांमध्ये कमालीचे उत्साहाचे वातावरण असते.कधी एकटे तर कधी आपल्या बाल मित्र मंडळींना सोबत घेऊन एकत्रित किल्ले बनविण्यात मुलांना भारी मौज वाटते.यंदाच्या दीपावलीत विद्यार्थी व नागरिकांसाठी किल्ले निर्मितीचा सर्जनशील उपक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोधवडेचे आदर्श शिक्षक सतेशकुमार मारुती माळवे यांच्या कल्पक संकल्पनेतून सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यातील आदर्श लोधवडे गावी राबविण्यात आला.
या उपक्रमाची खास वैशिष्ट्ये अशी होती की,नागरिकांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य मतदानाचा हक्क बजविणे,वाढत्या प्रदूषणाला रोखणे, वृक्षारोपण व संगोपन करणे, जलबचत करणे,स्त्री पुरुष समानता ठेवणे,महिला सुरक्षितेबद्दलचा जागर, शिक्षण,डिजिटल साक्षरता आदि.महत्त्वपूर्ण अशा राष्ट्रीय,सामाजिक, शैक्षणिक व पर्यावरणविषयक बाबींवर किल्ले निर्मितीतून जन जागृती करण्यात आली. त्याकरिता मतदार राजा जागा हो ! लोकशाहीचा धागा हो !आपले मत आपले भविष्य, झाडे लावा झाडे जगवा, पाणी वाचवा देश वाचवा, पाणी आडवा पाणी जिरवा,आमची दिवाळी प्रदूषण व फटाके मुक्त दिवाळी,भूषण भारता डिजिटल जनता,मुलगा मुलगी भेद नसे, यांसारखे राष्ट्रीय,सामाजिक व पर्यावरणात्मक जागृतीपर संदेश देणारी छोटी छोटी वाक्ये विद्यार्थ्यांनी आप आपल्या किल्ल्यांसमोर पाट्यांच्या रूपात लावली होती.ह्या संदेशपर पाट्यातून लोधवडे गावातील लोकांचे चांगल्या प्रकारे प्रबोधन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी साकारलेल्या किल्ल्यांच्या प्रतिकृतीने इतिहास जिवंत झाला.किल्ले निर्मितीने विद्यार्थ्यांना ऐतिहासिक वारशाचे स्मरण झाले.किल्ले निर्मितीत विद्यार्थ्यांनी आपली कल्पकता वापरून किल्ल्यांवरील तटबंदी, टेहळणी बुरुज, विविध प्रकारच्या माच्या,अवघड रस्ते, गुहा, कडे कपारी ,गडावरील मंदिरे, दऱ्या ,चोरवाटा,पाण्याची तळी,प्रवेशद्वार ,ऐतिहासिक राज्यांची आणि मंत्रीमंडळ बैठकीची ठिकाणे,सुरक्षा तोफा अशा अनेक बारीक सारीक गोष्टी यातून दाखविल्या आहेत.याशिवाय पाना फुलातील रांगोळ्यांनी किल्ल्यांची छान सजावटही केली आहे.या उपक्रमातून विद्यार्थ्यांना नव निर्मितीचा खूप आनंद मिळाला.किल्ले आणि त्यांच्या इतिहास संवर्धनाचे महत्त्व कृतीतून समजले.मतदान जागृती सारख्या अनेक महत्त्वपूर्ण बाबींचे मोलाचे महत्त्वपूर्ण संदेश समाजात पोहचविण्यासाठी यामुळे एक प्रकारे चांगली मदत झाली.विद्यार्थी व नागरिकांना लोकशाहीतील मतदानाचे महत्त्व समजले.तसेच फटाके व प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी केल्याचा आनंद विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनाही मिळाला.
या उपक्रमात मुख्याध्यापक मा. महादेव ननावरे,सह शिक्षक दिपक कदम,सतेशकुमार माळवे,सुचिता माळवे,संध्या पोळ,दिपाली फरांदे,मनिषा घरडे व अश्विनी मगर यांनी सक्रिय सहभाग घेऊन चांगले सहकार्य केले.अशा प्रकारच्या ह्या स्तुत्य समाज प्रबोधनपर उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले. यामध्ये प्रामुख्याने निवडणूक निर्णय व प्रांताधिकारी उज्जवला गाडेकर, तहसीलदार विकास अहिर, गटविकासाधिकारी प्रदिप शेंडगे, गट शिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे, शिक्षण विस्ताराधिकारी रमेश गंबरे, केंद्रप्रमुख शोभा पवार आदि मान्यवरांनी तसेच असंख्य पालक व ग्रामस्थांनीही भरभरून अभिनंदन केले.