विजय ढालपे,दहिवडी : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने प्रभाकर घार्गे यांना उमेदवारी देण्याचा शरद पवार यांनी जो निर्णय घेतला तो आमच्यासाठी अंतिम आदेश आहे.
पवार यांनी सांगितल्याप्रमाणे प्रभाकर देशमुख असतील वा प्रभाकर घार्गे निवडणूक ही एकाच ताकदीने लढविण्यात येईल. घार्गे यांना आम्ही विजयी करणार असून, माण-खटावमध्ये परिवर्तन निश्चित होणार आहे, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रभाकर देशमुख यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
या वेळी राहुल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत, जिल्हा युवक अध्यक्ष मकरंद बोडके, रमेश शिंदे, लालासाहेब ढवाण आदी उपस्थित होते. देशमुख म्हणाले, ”मी उमेदवारी करणार ही कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. ती पूर्ण न झाल्यामुळे कार्यकर्ते नाराज होते. बैठक घेऊन प्रमुख कार्यकर्ते, तसेच अधिकृत उमेदवार घार्गे यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
यापुढे घार्गे यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहून त्यांना विजयी करण्यासाठी मी स्वतः व पक्षाचे सर्व कार्यकर्ते कार्यरत राहणार आहेत. माण-खटाव मतदारसंघात तयार झालेली परिवर्तनाची लाट अधिक गतिमान करण्यात येईल. या मतदारसंघाला वेगळ्या उंचीवर नेण्याचा आमचा प्रयत्न राहील. शरद पवार यांची भूमिका ही नेहमीच महाराष्ट्राच्या हिताची राहिली आहे. शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून शरद पवार यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली आहे. त्यामुळे पक्षात फूट होऊनही सामान्य जनता, मतदार शरद पवार यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिले आहेत.”
असं का म्हणाले बंटी पाटील?
देशमुख म्हणाले, ”येथील लोकप्रतिनिधी पाणीप्रश्न अंतिम टप्प्यात आलाय म्हणतात. प्रश्न समजून घेऊन दृष्टिक्षेपात यायला १५ वर्षे लागतात का? हे काही कार्यक्षमतेचे लक्षण नाही. हिंगणीला पाणी गेल्याशिवाय अर्ज भरणार नाही, म्हणाले होते. गेले का हिंगणीला पाणी. बिजवडीला पाणी एक वर्षात गेले नाही तर राजीनामा देईन, असे मागील वेळी म्हणाले होते. गेले का बिजवडीला पाणी? त्याच त्याच पाइपचं पूजन दर वेळी केले जात आहे. थापा मारून लोकांना फसवायचं हे फार काळ टिकणार नाही.”
फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न
उरमोडीचे असो वा टेंभूचे पाणी याचे श्रेय हे शरद पवार यांचे आहे. फुकटचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे, तो दुर्दैवी आहे. लोकप्रतिनिधींनी मायणी मेडिकलसह विविध प्रकरणात गाजवलेल्या कर्तृत्वामुळे आपला मतदारसंघ सर्वत्र चेष्टेचा विषय झाला आहे, असेही देशमुख म्हणाले.