पोहेगांव प्रतिनिधी : कोपरगाव तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या श्री वीरभद्र बिरोबा महाराज यांच्या भव्य जंगी यात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री वीरभद्र बिरोबा महाराज देवस्थान ट्रस्टच्या वतीने देण्यात आली. श्री वीरभद्र बिरोबा महाराज देवस्थान ट्रस्ट आयोजित ही जंगी यात्रा रविवार दिनांक 17 नोव्हेंबर ते सोमवार दिनांक 18 नोव्हेंबर पर्यंत सुरू राहणार आहे.
श्री विरभद्र बिरोबा महाराज देवस्थान ट्रस्ट व यात्रा उपसमिती यांच्यावतीने नारळ फोडून पावती पुस्तकाचे पूजन करण्यात आले. रविवार दिनांक १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते ११ या वेळेत मूर्तीची पुजा, होम हवन व अभिषेक होणार आहे. तर संध्याकाळी पाच वाजता काठीची व मुखवट्याची मिरवणूक सोनेवाडी गावातून काढण्यात येणार आहे. रात्री नऊ वाजता शोभेची दारू उडवण्यात येणार आहे , मनोरंजनासाठी खेळ तमाशा चा कार्यक्रम यात्रा उपसमितीच्या वतीने ठेवण्यात आला आहे. सोमवार दिनांक 18 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता हजऱ्यांचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी दोन ते सहा या वेळेत महाराष्ट्रातील नामवंत मल्लांच्या जंगी कुस्त्याचा हंगामा रंगणार आहे. व त्यानंतर रात्री नऊ ते बारा वेळेत तमाशाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.
विरभद्र बिरोबा महाराज देवस्थान ट्रस्ट स्थापन झाले असून लवकरच क दर्जा मिळण्यासाठी ट्रस्टचे प्रयत्न असणार आहे. तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत मंदिर परिसरात विविध विकास कामे होण्यासाठी विरभद्र बिरोबा महाराज देवस्थान ट्रस्ट प्रयत्न करणार असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र गुडघे व उपाध्यक्ष संजय गुडघे , सचिव भिमराज गुडघे यांनी सांगितले. या यात्रेसाठी बाहेर जाऊन येणाऱ्या विविध व्यावसायिक दुकानदारांसाठी विशेष सुविधा करण्यात आली आहे. तरी पंचक्रोशीतील भाविकांनी या जंगी यात्रेचा लाभ घ्यावा असे आवाहन विरभद्र बिरोबा महाराज देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.