इचलकरंजी : शरद पवारांची साताऱ्यातली भर पावसातली सभा त्यांचे चाहते आणि महाराष्ट्रातली जनता अजूनही विसरलेली नाही. त्याच सभेची आठवण आज इचलकरंजीकरांना झाली.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शरद पवारांचे भाषण सुरु होताच पावसालाही सुरुवात झाली, शरद पवारांनी पावसातच आपलं भाषण सुरु ठेवलं.
ते म्हणाले की अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाची सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो. यावर कार्यकर्त्यांनी शिट्ट्या वाजवून घोषणा दिल्या.
महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांच्यासाठी इचलकरंजीत शरद पवारांच्या सभेचे आयोजन करण्यात आलं होते. मात्र पवार भाषणाला उभे राहतात पावसाला सुरुवात झाली तरीरी त्यांनी आपले भाषण सुरु ठेवले.
शरद पवार म्हणाले की, सत्तेमध्ये बदल करायचा असेल तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजय करुन सत्ताबदलाचे एेतिहासिक काम उद्याचा 20 तारखेला तुम्हा सर्वांना करायचे आहे. भर पावसात तुम्ही या ठिकाणी आलात, आम्हा लोकांची भूमिका समजून घेण्याची तयारी दाखवलीत त्या तुम्हा सर्वांना लाख लाख धन्यवाद देतो.
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपकडून राहुल आवाडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मदन कारंडे आहेत. मदन कारंडे यांनी मतदारसंघ पिंजून काढत आवाडेपुढे आव्हान उभं केलं आहे. आता प्रचाराच्या उत्तरार्धात शरद पवार यांची पावसात सभा झाल्याने चुरस आणखी वाढणार आहे.
साता-यात गाजली होती पावसातील सभा
साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केला. त्यांना भाजपाच्या तिकीटावर सातारा लोकसभेची पोटनिवडणूक लढवावी लागली. त्यांच्याविरोधात शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारासाठी भर पावसात सभा घेतली होती. या सभेनंतर साताऱ्यातली राजकीय गणितं बदलली. शरद पवारांच्या पावसातील सभा खूप गाजली. उदयराजे भोसले यांना निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले.