वंचितचे अधिकृत उमेदवार शकील चोपदार यांचा आ. आशुतोष काळे यांना जाहीर पाठींबा

0

कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर गुरुवार (दि.१४) रोजी आ.आशुतोष काळेंच्या प्रचारार्थ पार पडलेल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सभेला झालेल्या रेकॉर्डब्रेक गर्दीने मतदार संघात झालेल्या विकासाची साक्ष देवून भविष्यात आ.आशुतोष काळेंच्या विकासाच्या व्हिजनवर शिक्कामोर्तब केले. आणि याच विकासाच्या मुद्द्यावर वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार शकील चोपदार यांनी देखील विधानसभा निवडणुकीतून माघार घेवून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या साक्षीने आ.आशुतोष काळेंना पाठिंबा देण्याची ग्वाही दिली आहे.

पाच दिवसावर विधानसभा निवडणूक येवून ठेपली आहे. दिवसागणिक प्रचाराची रंगत वाढत असतांना कोपरगाव विधानसभा मतदार संघात मात्र विकासाला साथ देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार शकील चोपदार यांनी आ.आशुतोष काळेंना पाठिंबा जाहीर केला आहे.त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे मतदान आ.आशुतोष काळेंच्या पारड्यात पडणार असून अगोदरच जड असलेले आ.आशुतोष काळे यांचे पारडे अधिकच जड झाले आहे. आ.आशुतोष काळेंच्या प्रचारार्थ पार पडलेल्या सभेत शकील चोपदार यांनी आपली भूमिका स्पष्ट करून पाठिंब्याचा निर्णय जाहीर केला यावेळी उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांनी त्यांचे स्वागत केले.

आपली भूमिका स्पष्ट करतांना शकील चोपदार यांनी सांगितले की, मुस्लीम व बहुजन समाजाचे प्रश्न सुटावे व कोपरगावचा विकास व्हावा या दूरदृष्टीतून वंचित बहुजन आघाडी पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी मला उमेदवारी दिली होती. त्यांनी मला ज्या उद्देशातून उमेदवारी दिली ते प्रश्न आणि मुद्दे व विकासाच्या प्रश्नांवर त्यांच्याशी माझी चर्चा होवून हे प्रश्न सोडविण्याचे आ. आशुतोष काळे यांनी आश्वासन दिलेले आहे. त्यांनी पाच वर्षात केलेला मतदार संघाचा विकास आणि त्यांच्याकडे असलेले विकासाचे व्हिजन याबाबत खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देखील कौतुक करून मतदार संघाच्या विकासाला निधी कमी पडू न देण्याची ग्वाही दिलेली आहे. त्यामुळे मुस्लीम व बहुजन समाजाचे जे प्रश्न घेवून विधानसभेची वंचित बहुजन आघाडी पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी मला उमेदवारी दिली ते प्रश्न उशिराने सोडविण्यापेक्षा ज्यांच्या पाठीवर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा हात आहे आणि कोपरगावच्या विकासाला साथ आहे त्या आ.आशुतोष काळे यांच्या माध्यमातून हे जे काही प्रश्न असतील ते लवकरात लवकर सुटू शकतात याची मला खात्री पटल्यामुळे मी विधानसभा निवडणुकीतून माघार घेवून आ.आशुतोष काळेंना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे.

ज्या उद्देशाने मला उमेदवारी देण्यात आली तो उद्देश माझ्या उमेदवारीमुळे साध्य होणार नसेल तर त्या उमेदवारीचा काय उपयोग परंतु मी उमेदवारी माघारी घेतल्यामुळे ते प्रश्न सुटणार असेल तर त्याला प्राधान्य देणे गरजेचे मला गरजेचे वाटले व वंचित बहुजन आघाडी पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांना देखील तेच अपेक्षित असणार आहे. त्याबाबत त्यांना समक्ष भेटून माझी भूमिका स्पष्ट करणार आहे व यापुढे देखील हे प्रश्न आ.आशुतोष काळे यांच्या सहकार्यातून लवकरात लवकर कसे सोडवून घेता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शकील चोपदार यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here