फुलंब्री : – जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा,वाकोद ता-फुलंब्री येथे ७५ वा संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.संविधान दिनानिमित्त शाळेत वैचारिक सभा घेण्यात आली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका मंगल वेळे मॅडम होत्या.सर्वप्रथम भारतीय संविधानाचे निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी संविधानाच्या सरनाम्याचे सामुदायिकपणे वाचन केले.या प्रसंगी शाळेतील इयत्ता आठवीच्या पंकजा,सृष्टी,अनुश्री,गौरी, ज्ञानेश्वरी व चौथीच्या स्वप्नाली,देवयानी,काजल, प्रियंका,मानसी,हर्षदा विद्यार्थ्यांनींनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यावर सुमधुर,प्रेरणादायी गीते सादर केली.संविधानाच्या उपयुक्ततेवर राधिका,दत्ता,कुमुद विद्यार्थ्यांनी आपली भाषणे सादर केली.
शाळेतील सहशिक्षक स्वप्नील पाटील यांनी आपल्या भाषणात संविधान निर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानावर प्रकाश टाकला.संविधान अभ्यासक उज्वलकुमार म्हस्के यांनी संविधानामुळे देशाची झालेली लक्षणीय प्रगती आणि संविधानातील महत्त्वाची कलमे याविषयी उपस्थितांना अमूल्य मार्गदर्शन केले.या प्रसंगी मंगला पाटील,सांडू शेळके,रुपाली ताठे यांची प्रमुख उपस्थिती होती.या सभेचे सूत्रसंचालन अर्चना ताठे व वेदिका घुगे या विद्यार्थिनींनी तर आभार प्रदर्शन सहशिक्षिका संगीता वाढोनकर मॅडम यांनी केले.या कार्यक्रमासाठी शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती.