मंचर : उमेदवार देवदत्त निकम यांना आघाडी देण्यास कमी पडल्याची घेतली जबाबदारी मंचर – कळंब (ता. आंबेगाव) येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकार्यांनी विधानसभेला महाविकास आघाडीचे उमेदवार देवदत्त निकम यांना कळंब गावातून आघाडी देण्यास कमी पडल्यामुळे शिवसैनिकांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून सर्व पदाधिकार्यांनी आपापल्या पदाचे राजीनामे पुणे जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरेश भोर यांच्याकडे सुपूर्द केले आहे.
अशी माहिती शिवसेना उद्धव ठाकरे तालुका समन्वयक ग्रामपंचायत सदस्य नितीन बाळू भालेराव यांनी दिली आहे.
शिवसेना, युवासेना समन्वयक रोहन कानडे, शिवसेना शाखाप्रमुख हर्षल भालेराव, शिवसेना युवा सेना अध्यक्ष सुमित वर्पे, उपशाखाप्रमुख प्रमोद पिंगळे, सुशील भालेराव, संतोष भालेराव, स्वप्निल भालेराव, नितीन थोरात, निलेश भालेराव, अमित मंडलिक, सुभाष भालेराव, कुमार भोक्से, रवींद्र वर्पे या सर्व शिवसैनिकांनी आपल्या पदाचे राजीनामे शिवसेना तालुका समन्वयक नितीन भालेराव यांच्याकडे सुपूर्द केले आहेत. नितीन भालेराव यांनी आंबेगाव तालुका कुस्तीगीर संघटना अध्यक्षपदाचाही राजीनामा दिला आहे.
सर्व शिवसैनिकांनी एकत्रित येत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुरेश भोर यांच्याकडे पदाचे राजीनामे सुपूर्द केले आहे. सर्व शिवसैनिकांनी तडकाफडकी राजीनामे दिल्याने कळंब गावाच्या राजकारणामध्ये खळबळ उडाली असून विविध पक्षाचे नेते या शिवसैनिकांना आमच्या पक्षात येण्यासाठी आग्रह करताना दिसून येत आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी भविष्यकाळात होणार्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुढील निवडणूकीत ग्रामपंचायत सदस्य नितीन भालेराव यांचे समर्थक अलिप्त राहणार की कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेणार, याबाबत तर्कवितर्क आणि गाव पातळीवर चौकात इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या चर्चांना उधाण आले आहे. कळंब गावामध्ये येत्या काळात होणार्या निवडणुकांमध्ये विरोधक सक्रिय दिसणार की, अलिप्त राहणार याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत.
गटात आघाडी, गणात पिछाडी
कळंब जिल्हा परिषद गटामध्ये शरदचंद्र पवार पक्षाचे देवदत्त निकम यांना आघाडी मिळाल्यामुळे या गटामध्ये निकम समर्थकांचे पारडे जड आहे. पंचायत समिती गणामध्ये वळसे पाटील यांना आघाडी मिळाली असली तरी, जिल्हा परिषद गटात निकम यांना आघाडी आहे. येत्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूकांमध्ये शिवसैनिक व शरदचंद्र पवार पक्षाचे सदस्य काय भूमिका घेणार हे येत्या काळात लवकरच दिसून येणार आहे.