कोल्हापूर : सह्याद्रीचे निसर्गरम्य रूप, घनदाट जंगल, पठार, त्यातील वन्यजीवांचा मुक्त वावर अनुभण्यासाठी चांदोली जंगल सफर करण्याची संधी वन्यजीव विभागाने दिली आहे.
यंदाच्या हंगामासाठी नुकतीच चांदोली अभयारण्य सफर सुरू झाली असून, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पर्यटकांना जंगल अनुभवण्यासाठी ७५ टक्के सवलत देण्यात येणार आहे. त्यामुळे जंगल पर्यटनाचा आनंद घेण्याची संधी आबालवृद्धांना आली आहे.
कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्याच्या सीमांवर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प विस्तारला आहे. कोल्हापुरातील चंदगड, आजरा, भुदरगड, राधानगरी, गगनबावडा, शाहूवाडीपासून पुढे चांदोली ते कोयना अभयारण्य या सर्व टापूत वाघांचा संचार आहे. यातील शाहूवाडीपासून कोयना जंगल टापूत सह्याद्री व्याघ्र प्रकल्प वाघाच्या अधिवास म्हणून राखीव आहे.
प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! ‘ट्रॅव्हल्स’च्या दरातच आता चक्क विमानप्रवास; ‘या’ कंपनीकडून संभाव्य दर प्रसिद्ध
या संपूर्ण परिसरात वाघांची भ्रमंती पूर्वापार आहे. अशा प्रदेशात जंगल सफरी करताना गवे, सांबर, हरण, खवले मांजर, भेकर, बिबट्या आदी वन्यजीवांचा वावर किंवा त्याच्या खुणा दिसून येतात. सोबत डोंगरदऱ्या, पठार, गवताळ प्रदेश, घनदाट जंगल एका फेरीत पाहता येते. त्यासाठी वन्यजीव विभागाने मातीचे रस्तेही तयार केले आहेत. त्यासाठी वन्यजीव विभागाची स्वतःची गाडी आहे. सकाळी सहा ते दुपारी तीन या वेळेत जंगलात प्रवेश दिला जातो.
याशिवाय जंगल परिसरातील गावांतील काही लोकांनी जंगल सफारीच्या खासगी गाड्यांची व्यवस्था केली आहे. येथेही शुल्क भरून चांदोली अभयारण्य पाहायला जाता येते. यंदाच्या हंगामातील जंगल सफारी सुरू झाली आहे. यंदाच्या हंगामात दीड हजारांवर पर्यटकांनी जंगल सफर केली आहे. दर शनिवारी- रविवारी सर्वाधिक प्रतिसाद असतो. वन्यजीव विभागाची गाडी तूर्त बंद असल्याने खासगी भक्कम व सुरक्षित असतील, अशी वाहने अभयारण्य पाहण्यासाठी आत सोडली जातात.
वीस किलोमीटर अंतराची फेरी
चांदोली अभयारण्याच्या प्रवेशद्वारावरून सफारीला प्रवेश आहे. तेथून झोळंबी, शेवताई मंदिर, खुंदलापूर, जनी आंबा, चांदोली अशी २० किलोमीटर अंतराची फेरी असते. चार ठिकाणी सेल्फी पॉईन्ट आहेत. दोन ठिकाणी विश्रांतीस्थळ आहे. मनोरे तीन ठिकाणी असून, एका बाजूला चांदोली धरणाचे पाणलोट क्षेत्र आहे. येथे विविध रंगीबेरंगी पक्ष्यांचे थवे दिसू शकतात.
‘चांदोली अभयारण्य पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत आहे. वन्यजीव विभागाच्या गाडीत गाईड वनरक्षकासह पर्यटकांना सफारी करण्याची सुविधा आहे. त्यासाठी २५० रुपये शुल्क आहे. यात कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पर्यटकांना वन्यजीव विभागाच्या शुल्कात ७५ टक्के सवलत आहे. त्यामुळे स्थानिकांचा सहभाग वाढत आहे.’
–एस. बी. नलवडे, वनक्षेत्रपाल, वन्यजीव विभाग
आरोग्य & लाइफ स्टाइल