एक देश एक निवडणूक अव्यवहार्य;: डॉ.नितीश नवसागरे

0

अनिल वीर सातारा : एक देश एक निवडणूक आणण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव अव्यवहार्य व लोकशाही व्यवस्थेला मारक आहे. त्यास विरोध केला पाहिजे. असे मत संविधानाचे अभ्यासक  डॉ. नितीश नवसागरे यांनी व्यक्त केले. भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त येथील संबोधी प्रतिष्ठानच्यावतीने पाठक हॉलमध्ये आयोजित केलेल्या ३८ व्या थोरांच्या स्मृती व्याख्यानमालेत, ‘एक देश एक निवडणूक व संविधान’ या विषयावर नवसागरे बोलत होते. अध्यक्षस्थानी संबोधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनकर झिंब्रे होते.

     

डॉ.नितीश नवसागरे म्हणाले, “भारतीय संविधान जगातील सर्वोत्तम आहे. त्यामुळेच गेल्या पन्नास वर्षात आपला देश एकसंघ राहिलेला आहे.एक देश एक निवडणूक संकल्पना अस्तित्वात आणण्यामध्ये अनेक संविधानिक धोके आहेत. त्यासाठी कराव्या लागणाऱ्या घटना दुरुस्तीमुळे संविधानाचा आशय बदलतो का ? हे तपासून बघावे लागेल. या घटना दुरुस्तीसाठी संसदेमध्ये दोन तृतीयांश बहुमत व देशातील पन्नास टक्के राज्यांची संमती आवश्यक आहे.देशात एकाच वेळी निवडणुका घेण्यामुळे खर्च वाचेल. हे कारण गैर लागू आहे. देशाचे एकूण बजेटमध्ये हा खर्च नगण्य आहे.लोकशाही टिकवण्यासाठीही किंमत मोजावी लागेल. हुकूमशाहीत तर निवडणूका होण्याची शक्यता नसल्याने हा सगळाच खर्च वाचेल. राज्यकर्त्यावर अंकुश ठेवण्यासाठी लोकशाहीत निवडणूक  आवश्यक आहेत. त्यासाठी आर्थिक कारण देणे चांगले नाही व हे लोकशाहीला पोषकही नाही. निवडणूक आचारसंहितेमुळे विकास कामात अडथळा येतो. हे म्हणणेही खरं नाही.

संपूर्ण देशासाठी एकच मतदार यादी प्रस्तावित आहे. हे देखील योग्य नाही. संपूर्ण देशाच्या केंद्रीय प्रश्नांवर निवडणुकीत चर्चा होणार असल्याने स्थानिक जीवन मरणाचे प्रश्नांकडे दुर्लक्ष होऊन ते बाजूला पडण्याची भीती आहे. संघराज्याचे  वैविध्यपूर्ण गोष्टींना सामावून घेणारे सर्व समावेशक वैशिष्ट्य टिकवुन ठेवणे गरजेचे आहे.असे असताना एक देश एक निवडणुकीचाअट्टाहास करणे योग्य नाही.”

     रमेश इंजे यांनी प्रास्ताविक केले.यशपाल बनसोडे यांनी आभार मानले. कार्यक्रमास संबोधी प्रतिष्ठानचे पदाधिकारी ऍड.हौसेराव धुमाळ,डॉ.सुवर्णा यादव,प्रकाश गायकवाड,केशव कदम,बनसोडे,किशोर बेडकिहाळ,रमेश जाधव,गणेश कारंडे,माजी प्राचार्य रमेश जाधव,डी.एस.भोसले,अशोक भोसले,अनिल वीर,ऍड.कुमार गायकवाड,ऍड.विलास वहागावकर,ऍड.सवादे,उत्तम पोळ,डॉ.प्रा.पाटील,कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवर, सजग नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here