सातारा : अजिंक्यतारा परिसरातील डोंगरावर असणाऱ्या जंगलातून वाट चुकलेल्या तरसाचा माची पेठ व शनिवार पेठ येथे अजूनही वावर आहे. वनविभागाने वेळीच तातडीने पिंजरा लावून त्याला सुरक्षित अधिवासात सोडण्याचे कोणतेही प्रयत्न केलेले नाही तरच मानवी वस्तीत खुलेआम फिरत असल्याने नागरिकांमध्ये अजूनही भीतीचे वातावरण आहे
गेल्या दोन दिवसापासून माची पेठ परिसरात तरसाचा वावर असल्याचे वृत्त माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले होते. तीन तरसांपैकी एक तरस अजूनही बागवान गल्ली, बेगम मशिद, शनिवार पेठ, रेणुका माता मंदिर ते दत्त मंदिर या परिसरामध्ये फिरत आहे. रात्रीच्या वेळी निर्जन रस्त्यावरून तरस फिरत असून ते सावजाच्या शोधात आहे अशी दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्याने टिपली आहेत. अनाहूतपणे तरस समोर आल्यास नागरिकांची भीतीने गाळण उडत आहे. परिणामी दोन्ही पेठांमध्ये रात्रीच्या वेळी बाहेर रेंगाळणे नागरिक टाळत आहेत.
सातारा वनविभागाचे वन क्षेत्रपाल डॉ. निवृत्ती चव्हाण यांना याबाबत कल्पना नागरिकांनी दिली होती. मात्र, अद्याप परिसरात पिंजरा लावून त्याला सुरक्षित अधिवासात सोडण्याचे कोणतेही प्रयत्न झालेले नाहीत.गेल्या तीन दिवसापासून तरसाचा वावर असल्यामुळे नागरिक परिसरात दबकत फिरत आहेत. या तरसाने या परिसरातील दोन डुकरे आणि दोन कुत्र्यांचा आतापर्यंत फरशा पडल्याची माहिती आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन साधी चौकशी सुद्धा करण्याचे कष्ट घेतलेले नाहीत. वनविभागाने तत्काळ याबाबत सुरक्षित उपाय योजना राबवण्यात अशी नागरिकांची मागणी आहे