संगमनेर ; प्रवरा कारखान्याने आपल्या तालुक्यात गट ऑफिस सुरू केलं. आता यांचा पुढचा हल्ला आपल्या सहकारी संस्थांवर देखील राहील. नवीन आमदार झाल्यानं त्यांना ही हिंमत झाली आहे. नवीन झालेला आमदार हे त्यांचे हत्यार आहे. काही मंडळी मला म्हणत होती की तुम्ही तिकडे कशाला गेले. मात्र त्यांनी मंत्री (विखे पाटील) झाल्यावर आमच्या कार्यकर्त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. अनेकांवर खोट्या केसेस टाकल्या. मग माझ्याकडे पर्याय नव्हता. मी हा अन्याय सहन करू शकत नाही. त्यानंतर तिकडे गेलो आणि गणेश कारखाना ताब्यात घेतला. मी स्वतः यांच्या विरोधात खंबीरपणे उभा राहणार आहे. काही झालं तरी देखील मी उभा राहणार, असा इशारा बाळासाहेब थोरात यांनी विखे पाटलांना दिला आहे.
संगमनेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस नेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा शिवसेना शिंदे गटाचे अमोल खताळ यांनी धक्कादायक पराभव केला. निकालानंतर बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या मेळाव्यातून बाळासाहेब थोरात यांनी भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
थोरात पुढे म्हणाले की मी निळवंडे धरणाचे सुरू केलेलं काम पूर्ण करण्यात यशस्वी ठरलो. पाटबंधारे राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळाच्या कामात भाग घेतला व त्यानंतर कृषी, शिक्षण व महसूल यांच्यासह अनेक खाते मी यशस्वीपणे सांभाळली. महसूल खातं माझ्याकडे असताना अनेक महत्त्वाचे निर्णय मी घेतले, असे म्हणत बाळासाहेब थोरात यांनी सत्यजीत तांबे यांच्याकडे बघत फडणवीस यांच्याकडे कधी गेला तर तू तर त्यांना विचार ते सुद्धा मान्य करतील, असे म्हटले.
जुन्या पिढीला सगळा इतिहास माहिती आहे. मात्र तरुण पिढीला ते अजूनही माहित नाही. 1985 मध्ये काय परिस्थिती होती आणि आज काय याचा विचार केला पाहिजे. निळवंडे धरणाचे श्रेय घेण्यासाठी आज अनेक जण पुढे येत आहे. मात्र त्यांचा सहभाग काय हे एकदा त्यांनी सांगावे, असे म्हणत बाळासाहेब थोरात यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका केली. तर, शहराचा पाणी प्रश्न मी कायमचा सोडवला. थेट धरणातून पाईपलाईन शहरासाठी आणली. मात्र, ज्यांनी त्या दिवशी फटाके वाजवले ना त्यांनी सुद्धा आपण आणलेलंच पाणी घरात गेल्यावर पिले असेल. थोडी तरी कृतज्ञता ठेवायला हवी, असे म्हणत बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर शहरातून कमी मताधिक्य मिळाल्याने भाषणातून नाराजी व्यक्त केली.