वयाच्या ८४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
अहिल्यानगर/अकोले ज्येष्ठ नेते आणि माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांचे निधन झाले. वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. मधुकर पिचड यांची आज प्रकृती खालावली होती. ब्रेन स्ट्रोक आल्याने पिचड यांच्यावर दोन महिन्यांपासून नाशिक येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
राज्यातील आदिवासी समाजातील नेतृत्व तसेच ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांना १५ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास राजूर येथील राहत्या घरी असताना ब्रेनस्ट्रोकचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना नाशिकच्या ९ पल्स रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान मधुकर पिचड यांच्या जाण्याने चिरंजीव वैभव पिचड यांच्यासह कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळलाय.
मधुकरराव पिचड हे १९८० ते २००४ या काळात नगरमधील अकोले विधानसभा मतदारसंघातून विधानसभेचे आमदार म्हणून सलग सात वेळा निवडून आले आहेत. मार्च १९९५ ते जुलै १९९९ या काळात ते महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेतेही होते. एकेकाळी जेष्ठ नेते शरद पवारांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू म्हणून पिचड यांची ओळख होती. मात्र मोदी लाटेमध्ये अनेक जवळच्या नेत्यांनी पवारांची साथ सोडत भाजपचा रस्ता धरला . त्याला मधुकर पिचड हेही अपवाद न होता त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. मधुकर पिचड राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य होते, परंतु २०१९ मध्ये त्यांनी त्यांचा मुलगा वैभव पिचड यांच्यासह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले होते.
मधुकर पिचड यांचा संपूर्ण प्रवास
मधुकर काशिनाथ पिचड, माजी मंत्री
जन्मतारीख – ०१ जून १९४१
शिक्षण – पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात बी ए एल एल बीचे शिक्षण. तिथूनच विद्यार्थी राजकारणाला सुरुवात
राजकीय प्रवास –
– अकोले पंचायत समितीवर सदस्य म्हणून १९७२ ला निवड
– १९७२ ते १९८० पंचायत समितीवर सभापती म्हणून निवड
– १९८० पासून २००९ पर्यन्त सलग ७ वेळेस आमदार म्हणून विधानसभेवर निवडून आले
– १९९५ ते जुलै १९९९ या काळात विधानसभेचे विरोधी पक्षनेते पदाची धुरा सांभाळली होती.
– राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणूनही पिचड यांनी धुरा सांभाळली होती
– मधुकर पिचड यांचा राजकीय प्रवास कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि त्यानंतर भाजप असा राहिलाय.
– राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून शरद पवार यांच्यासोबत होते, २०१४ ला अकोले मतदार संघात पुत्र वैभव पिचड यांना राष्ट्रवादीकडून निवडून आणले
– २०१९ ला पिचड यांनी आपल्या मुलासह भाजपात प्रवेश केला. त्यावेळी वैभव पिचड यांचा भाजपच्या तिकीटावर पराभव झाला.
– मधुकर पिचड यांनी अमृत सागर दूध सहकारी संस्थेची स्थापना केली
– मधुकर पिचड यांनी १९९३ मध्ये अगस्ती सहकारी साखर कारखाना स्थापन केला
– आदिवासी विकास, भटक्या जमाती आणि इतर मागासवर्गीय कल्याण, प्रवास विकास आणि पशु, संवर्धन आणि मत्स्यव्यवसाय अशा विविध खात्यांची जबाबदारी पार पाडलीये