हजारोंच्या गर्दीत जय भवानी जय शिवाजीचा नारा..
प्रतापगङ:दि.८
आज किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हजारोंच्या संख्येने उपस्थित शिवभक्तांनी जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात परिसर दुमदुमून टाकला. सकाळी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांच्या उपस्थितीत भवानी मातेची महापूजा विधिवतपणे पार पडली. पुजारी शंकर गुरुजी यांनी पौरोहित्य केले.
भवानी मातेच्या मंदिरासमोर ध्वजस्तंभाचे पूजन करून शिवशाहीचे प्रतीक असणाऱ्या भगव्या ध्वजाचे रोहण कुंभरोशीचे सरपंच कांचन सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मानाच्या पालखीची पूजा करण्यात आली आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची पालखीची मिरवणूक सुरू झाली. पोलीस अधीक्षक, अप्पर जिल्हाधिकारी यांच्यासह सर्व मान्यवरांनी पालखी घेऊन मिरवणूक मार्गस्थ केली.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जावली, दरे, वाडा कुंभरोशीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी लेझीम, तुताऱ्या, काठीवर चालणे असे विविध कार्यक्रम सादर करून उत्सवाला चार चांद लावले. आई भवानी मातेचा व शिवरायांचा जयजयकार करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घोषणांनी मिरवणूक मार्ग दुमदुमून गेला.
ढोल, ताशांचा निरंतर गजर, तुताऱ्या, झांजांचा आवाज आणि हेलिकॉप्टरमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. शिवकालीन धाडशी खेळांचे प्रात्यक्षिक देखील सादर करण्यात आले.