कोल्हापूर : ऊस दरासंदर्भात आयोजित केलेल्या बैठकीस उपस्थित न राहिलेल्या सर्व साखर कारखानदारांना येथील प्रादेशिक साखर सहसंचालक गोपाळ मावळे यांनी नोटिसा बजावल्या आहेत.
यापुढे असे न होता, पुढील बैठकीस कळविल्यानंतर तातडीने उपस्थित राहावे; अन्यथा ऊस नियंत्रण आदेश १९६६ चे खंड ९ गाळप आदेश १९८४ चे खंड १३ नुसार कारवाई केली जाईल, असा इशारा या नोटीसमधून देण्यात आला आहे.
दरम्यान, विधानसभेचे अधिवेशन असल्याने २३ डिसेंबरनंतरच साखर कारखानदारांची बैठक होईल, अशी शक्यता आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार प्रादेशिक साखर सहसंचालकांनी साखर कारखाना प्रतिनिधी, संघटना प्रतिनिधी व शेतकरी यांची बैठक सोमवारी(ता.०९) झाली.
या बैठकीस आजरा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक वगळता अन्य कारखान्यांचे चेअरमन किंवा अधिकारी उपस्थित राहिले नाहीत. यामुळे पुन्हा साखर कारखानदार, शेतकरी संघटना प्रतिनिधी यांची बैठक आयोजित केली जाणार आहे. त्या बैठकीस कारखान्याच्या प्रतिनिधींनी सक्तीने उपस्थित राहावे; अन्यथा कारवाईचा बडगा उचलला जाईल, असा इशारा या नोटीसमधून दिला आहे.
शेतकरी संघटनांची मागणी अशी
२५ ॲाक्टोंबरला जयसिंगपूर येथे झालेल्या ऊस परिषदेमध्ये गळीत हंगाम २३-२४ गळीत हंगामातील २०० रूपये अंतिम हप्ता व गळीत हंगाम २०२४-२५ च्या ३ हजार ७०० रूपयाच्या प्रतिटन पहिल्या उचलीची मागणी करण्यात आली होती. चालू गळीत हंगामामध्ये साखर कारखान्यांनी पहिल्या ५० दिवसात कार्यक्षेत्रातीलच ऊस गाळप करावा. पुरामध्ये बाधीत झालेल्या ऊसाची प्राधान्याने पहिल्यांदा तोड करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.