पाचगणी : पाचगणी शहरात प्रवेश करताना जकातनाका परिसरात होणारी वाहतुकीची कोंडी आता रस्ता रुंदीकरणाचे काम नगरपालिकेने हाती घेतलेल्या सुटणार आहे. जकातनाक्यावर वारंवार होण्या वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांसह स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने नगरपालिकेने रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे.
या रुंदीकरणात येणारी काही झाडे पर्यारवण नियंत्रण समितीच्या परवानगीने तोडण्यात आली असून जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरु असल्याची माहिती प्रशासक तथा मुख्याधिकारी निखील जाधव यांनी दिली.
याबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, पाचगणीत प्रवेश करतानाच रिवाईन हॉटेल या ठिकाणी पालिकेचा जकातनाका आहे. या जकात नाक्यावर पर्यटकांना प्रवेश शुल्क भरावा लागतो व नंतरच प्रवेश दिला जातो. शुल्क देण्यासाठी पर्यटकांची वाहने थांबतात व नेहमीच या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते. सततच्या वाहतूक कोंडी मुळे पर्यटकांचा वेळ वाया जात होता व पर्यटकांना व नागरिकांना या वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत असल्याने या ठिकाणी रस्ता रुंदीकरण करणे हा एकच पर्याय होता.
जकातनाका परिसरात जागा कमी असल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडीचा प्रश्न नेहमीचाच आहे. त्यामुळे शासकीय निधीतून या ठिकाणी रस्ता रुंदीकरण करणाचे काम नगरपालिकेच्या माध्यमातून सुरू आहे. हे काम करत असताना आजूबाजूची काही झाडे तोडावी लागत होती. पालिकेने या रुंदीकरणात येणारी काही झाडे पर्यारवण नियंत्रण समितीच्या परवानगीने तोडली असून त्याबदल्यात याच ठिकाणी रस्त्याच्या कडेला नवीन झाडे लावण्यात येणार आहेत.
सध्या जकातनाका परिसर या ठिकाणी कमीत कमी वीस फूट रुंद असा रस्ता वाढवण्यात येत असून त्याचे काम गतीने सुरु आहे. या रुंदीकरण प्रकल्पाची पाहणी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरु आहे. हे रस्ता रुंदीकरण झाल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या दूर होणार असून पर्यटकांसह स्थानिक नागरिकांचा वेळ व इंधन वाचणार असल्याचे निखील जाधव यांनी सांगितले.
रुंदीकरणामुळे होणार हे फायदे
जकात नाका रुंदीकरणामुळे वाहतुकीची कोंडी होणार नसल्याने स्थानिकांना वेगळा मार्ग काढून पुढे जाणे सोपे होईल. तसेच अत्यावश्यक वाहनांना उदाहरणार्थ रुग्णवाहिकांना बाहेर पडणे सोपे होणार आहे. रस्ता रुंदीकरणामुळे वाहनांची गर्दी कमी होईल व पर्यटकांचा वेळ वाचणार आहे. हे काम गतीने सुरु असून ते लवकरच पूर्ण होईल.