सातारा : जगात प्रसिद्ध असलेल्या सातारा येथील कास पठार येथील एका हॉटेलमध्ये काही तरुणांनी रेव्ह पार्टी करत धिंगाणा घातला आहे. या हॉटेलमध्ये बारबालांना नाचवत अश्लील कृत्य केल्याचे व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत.
या ठिकाणी झालेल्या भांडणात काही जण जखमी देखील झाले आहेत. या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पोलिसांनी या प्रकरणी चौकशी करत आहेत.
सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात वर्ल्ड हेरिटेज साईट असलेल्या कास पठारावरील एका हॉटेलमध्ये काल रात्री रेव्ह पार्टी करण्यात आली. या पार्टीत तरुणांनी धिंगाणा घालत बारबालांसोबत अश्लील नृत्य करत चाळे केले. ऐवढेच नाही तर दारुच्या नशेत हमाणारी देखील केली. ही घटना शनिवारी रात्री १०.३० च्या सुमारास एकीव गावातील हॉटेल जय मल्हारमध्ये घडली. दरम्यान, या घटनेची माहिती पोलिसांना नव्हती. पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. हाणामारीत तिघे जण जखमी झाले आहे. तर ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे साताऱ्यात खळबळ उडाली आहे. हॉटेल जय मल्हारमध्ये झालेल्या रेव्ह पार्टीमध्ये काही जणांनी अश्लील चाळे केले. यातून ही हाणामारी झाल्याचे वृत्त आहे. आरोपींनी हॉटेल आणि येथे असलेल्या गाड्यांची देखील तोडफोड केली.
ही रेव्ह पार्टी सलीम कच्ची याने आयोजित केली असल्याची माहिती आहे. हा साताऱ्यातील मोठा गुंड आहे. त्याने त्याच्या काही साथीदार व १० बारबालांसोबत दारु, अंमली पदार्थांचे सेवन या रेव्ह पार्टीत केले. ही पार्टी रात्रभर चालली.
पोलीस अधीक्षक समीर शेख म्हणाले….
या घटनेचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यावर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख म्हणाले, ही रेव्ह पार्टी कोणत्याही पोलीस बंदोबस्तात झाली नाही. या प्रकरणी तपास सुरू करण्यात आला आहे. लवकरात लवकर दोषींवर कारवाई केली जाईल. ८ तारखेला झालेल्या या घटनेचे अनेक साक्षीदार आहेत. येथील एका हॉटेलमध्ये काही लोकांमध्ये भांडणं झाली. त्यातून तोडफोड देखील करण्यात आली. संबंधित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावरही कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे शेख म्हणाले.