देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
राहुरी तालुक्यातील वांबोरी गेल्या काही दिवसांपूर्वी दोन बिबटे नेहमी दर्शन देत होते. मात्र आज, शनिवारी सकाळी एक बिबट्या पुन्हा पिंजऱ्यात कैद झाला आहे. मात्र जेरबंद केलेल्या बिबट्याला सुरक्षित ठिकाणी निसर्गात मुक्त करण्यात येणार आहे, असल्याची माहिती समजते.
वांबोरी येथे राहुरी रस्त्याजवळ एका वस्तीवर दोन बिबटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. ही घटना गुरुवारी (१२ डिसेंबर) उघडकीस आली. तत्पूर्वी बुधवारी रात्रीच बिबट्या आढळून आल्याची चर्चा गावभर पसरली होती. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करत बिबट्याला पळवून लावले. त्यामुळे वांबोरी परिसरात बिबट्याच्या दहशतीने भितीचे वातावरण पसरले होते.
काल, शुक्रवारी (१३ डिसेंबर) वन विभागाने येथे पिंजरा लावला होता. या पिंजऱ्यात मध्यरात्री बिबट्या जेरबंद झाला. शनिवारी सकाळी बिबट्याला पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. पकडलेल्या बिबट्याला पुन्हा निसर्गात मुक्त करण्यासाठी वांबोरी येथून रवाना केले असल्याचे समजले आहे.