नृसिंहवाडी : दिगंबरा दिगंबराच्या अखंड भजनात व श्री गुरुदेव दत्तच्या गजरात कृष्णा-पंचगंगा संगमतीर्थावर भक्तीमय वातावरणात श्री दत्त महाराजांच्या राजधानीत श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे आज, शनिवारी सायंकाळी पाच वाजता श्री दत्त जन्मकाळसोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
दत्तदर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती.
मंदिरात दत्तजयंती निमित्य विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे 3.3० वाजता काकड आरती व षोडशोपचार पूजा, सकाळी सात ते बारा यावेळेत अनेक भक्तांनी ‘श्री ना’ पंचामृत अभिषेक पूजा केली. दुपारी साडेबारा वाजता श्रींच्या चरणकमलावर महापूजा करण्यात आली. महापूजा झालेवर भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला.
दुपारी तीन वाजता येथील ब्रम्हवृंदा मार्फत पवमान पंचसुक्त पठन, साडेचार वाजता श्रींची उत्सवमूर्ती श्री नारायणस्वामी महाराज यांचे मंदिरातून वाजत गाजत मुख्यमंदिरात आणण्यात आली. हरीभक्त पारायण भालचंद्र देव यांचे कीर्तनानंतर ठिक पाच वाजता धार्मिक वातावरणात लाखो भाविकांच्या उपस्थितीत विधिवत श्रीदत्त जन्मकाळ सोहळा संपन्न झाला.
चांदीच्या पाळण्याला आकर्षक सजावट
जन्मकाळ सोहळ्यासाठी चांदीचा पाळणा विविध रंगाच्या फुलांनी आकर्षक सजविला होता. उपस्थित असंख्य भाविकांनी सजविलेल्या पाळण्यावर अबिर, गुलाल व फुलांची मुक्तहस्ताने उधळण केली. जन्मकाळानंतर येथील दत्त मंदिरात पारंपारिक पाळणागीते, आरती, प्रार्थना करण्यात आली. रात्री दहा नंतर मंदिरात धूप, दीप,आरती व पालखी सोहळा संपन्न होणार आहे.
जन्मकाळ सोहळ्यासाठी महाराष्ट्रसह गुजरात, कर्नाटक, गोवा आदी अनेक राज्यातून लाखो भाविक आले होते. भाविकांच्या सोयीसाठी येथील दत्त देव संस्थान मार्फत अनेक सोयी व सुविधा पुरविणेत आल्या. मंदिर परिसरात ठीकठिकाणी क्लोज सर्किट टीव्ही.ची व्यवस्था, दर्शन रांगेची उत्तम व्यवस्था,तसेच मुखदर्शन, महाप्रसाद, जन्मकाळानंतर सुंठवडा प्रसाद वाटप, नदीचा काठी इनरट्यूबची व्यवस्था करण्यात आली होती. एसटी महामंडळामार्फत सुमारे १०० जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. पोलीस, गृहरक्षक दल, व्हाईट आर्मी, वजीर रेस्क्यू फोर्स व शाळा व कॉलेजच्या स्वयंसेवकांच्या सहकार्याने चोख बंदोबस्त होता.